ठाणे: माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्याचे वृत्त शहरात पसरताच राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यावर धडक दिली. पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन करीत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वर्तकनगर पोलिसांनी आव्हाड यांना दुपारी एक वाजता ताब्यात घेतल्यानंतर तीन वाजण्याच्या सुमारास अटक केली.
ही माहिती स्वत: आव्हाड यांनीच ट्वीटरद्वारे दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. यावेळी कळवा, मुंब्रा भागातील आंदोलकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. आव्हाड साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, जितेंद्र आव्हाड अंगार है, बाकी सब भंगार है, सरकार डरती है, पोलीस को आगे करती है, अशी घोषणाबाजी कार्यकर्ते करीत होते. आंदोलकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड आणि सहायक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांनी राज्य राखीव दलासह स्थानिक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात केला.
उपायुक्तांना घेरावसायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उपायुक्त राठोड हे त्यांच्या सरकारी मोटारीने पोलीस ठाण्याबाहेर पडत होते. त्यावेळी घोषणाबाजी तीव्र करण्यात आली. त्यामुळे राठोड मोटारीतून बाहेर उतरले. पोलीस आणि घोषणाबाजी करणाऱ्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत बाहेर पडलेले राठोड पुन्हा पोलीस ठाण्यात परतले.
तीन दिवसांनी अटक कशी?आव्हाड यांनी संबंधित प्रेक्षकाला कोणतीही मारहाण केलेली नाही, तशी प्रतिक्रियाही त्या प्रेक्षकाने दिली होती. मग आव्हाड यांना अशी तीन दिवसांनंतर अचानक अटक कशी होऊ शकते, अशी प्रतिक्रिया आंदोलक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
न्यायालयातही बंदोबस्त
आव्हाडांच्या अटकेनंतर पोलीस ठाण्याबाहेर राष्ट्रवादीने आंदोलन केल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्यांना न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनीठाणे न्यायालयाच्या बाहेरही मोठा फौजफाटा तैनात केला होता. मात्र, आव्हाड यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांच्या अटकेच्या प्रक्रियेला उशिर झाल्यामुळे सायंकाळी सहा वाजल्यानंतर न्यायालयाच्या बाहेरील बंदोबस्त कमी करण्यात आला. सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आव्हाड यांना वैद्यकीय तपासणीकरिता पोलीस ठाण्याच्या बाहेर काढण्यात आले. सरकारच्या इशाºयावरुन पोलिसांनी हेतूत: प्रक्रिया लांबवली, असे आरोप कार्यकर्त्यांनी केले.