काँग्रेस सोडल्यानंतर त्यांना मिळाले केवळ एक मत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 03:43 AM2019-03-22T03:43:17+5:302019-03-22T03:43:37+5:30

नगर परिषद व महापालिकेत अनेक वर्षे नगरसेवक म्हणून निवडून आलेले उत्तनचे लिओ कोलासो यांनी शहराच्या नियोजन समिती सभापतीपासून अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. मच्छीमारांचे नेते म्हणून ते सक्रिय आहेत.

After leaving Congress, they got only one vote | काँग्रेस सोडल्यानंतर त्यांना मिळाले केवळ एक मत

काँग्रेस सोडल्यानंतर त्यांना मिळाले केवळ एक मत

- लिओ कोलासो

नगर परिषद व महापालिकेत अनेक वर्षे नगरसेवक म्हणून निवडून आलेले उत्तनचे लिओ कोलासो यांनी शहराच्या नियोजन समिती सभापतीपासून अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. मच्छीमारांचे नेते म्हणून ते सक्रिय आहेत. पूर्वीच्या निवडणुकांचा काळ कसा होता, हे सांगताना वयाच्या ७० व्या वर्षात पदार्पण केलेल्या कोलासो यांच्यात एक वेगळाच उत्साह जाणवला.

उत्तन म्हणजे पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला. त्याकाळी गावातील लोकांना दुसरा पक्षच चालत नव्हता. मी चौथीमध्ये शिकत असताना मामा सरपंच होते. निवडणूक काळात शाळा सुटली की, मामा मतदार यादी लिहून काढायला सांगत. झेरॉक्स नसल्याने त्याच्या प्रती तयार करायला कार्बन पेपर वापरला जायचा. हात काळे व्हायचे. यादी बनवून आणि वाटून झाली की, चहा आणि खाजा मिळायचा.
सध्याचा उत्तननाका व देना बँक येथील चौकात निवडणुकीच्या प्रचार सभा व्हायच्या. अनेक राजकीय सभा येथे झाल्या. गावातील गल्लीबोळांतून प्रचाराची मोठी रॅली घोषणा देत निघायची.

कार्यकर्त्यांमध्ये जसा उत्साह असायचा, तसाच उत्साह मतदारांमध्ये पण असायचा. सभेतील भाषणं ऐकायला लहानांपासून मोठे सर्व झाडून यायचे. आतासारखी भाड्याची माणसं व कार्यकर्त्यांची गर्दी जमवावी लागायची नाही. मतदानाच्या दिवशी चहापाण्याचा खर्च काय व्हायचा तोच.

त्याकाळी कृष्णा मेनन हे मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून निवडून यायचे. ते देशाचे संरक्षणमंत्री होते. १९६७ च्या लोकसभा निवडणुकीवेळी ते काँग्रेस सोडून अपक्ष म्हणून उभे राहिले होते. स.गो. बर्वे यांची बहीण ताराताई सप्रे काँग्रेसच्या उमेदवार होत्या. उत्तन गावातून मेनन यांना फक्त एकच मत मिळालं होतं. ते मत कोणाचं होतं, हे अख्ख्या गावाला कळलं होतं.

भारत सरकारची त्याकाळी आकाशवाणी योजना होती. ग्रामपंचायत कार्यालयात रेडिओ सेट द्यायचे. गावात त्या रेडिओला मोठा भोंगा लावायचे. त्याचे लोकांना खूप कुतूहल होते. तीच एक करमणूक असायची. सकाळपासून दुपारपर्यंत आणि पुन्हा सायंकाळी गाणी आदी लागायचे. बातम्या असायच्या. निवडणुकीच्या काळात तर रेडिओवरच्या बातम्या ऐकण्यासाठी मुख्य चौकात गर्दी जमायची.
एका निवडणुकीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले उत्तन येथे प्रचारसभेसाठी येणार होते. गावातला रस्ता खराब. नवघरचे मोरेश्वर पाटील हे बांधकाम समिती सभापती होते. मग काय, रातोरात त्यांनी धावाधाव करून रस्ता ठीकठाक करण्यासाठी दगडखडी टाकून घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या गाड्या आल्या, त्यावेळी रस्त्यासाठी टाकलेल्या त्या दगडखडीचा उडालेला धुरळा आजही आठवतो.

अधिकाऱ्यांना मेजवाणी

गावात एकच हॉटेल होतं. निवडणुकीसाठी अधिकारी यायचे. मग, ग्रामस्थ मोठ्या आपुलकीने जेवणाची सोय करायचे. माशाचे कालवण, भाकऱ्या, सुक्या बोंबलाची चटणी असे कोळी पद्धतीचे जेवण म्हणजे आठवणीत राहणारी मेजवानीच असायची.

Web Title: After leaving Congress, they got only one vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.