लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती लक्षात घेऊन २० आणि २१ नोव्हेंबर रोजीच्या छटपूजेस मुंबई महापालिका आणि पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता ठाणे पोलिसांनीही शहरातील विविध तलाव, नदी आणि खाडीकिनारीच्या छटपूजेस परवानगी नाकारली आहे. शहरात आधीच जमावबंदी लागू असल्यामुळे छटपूजेसाठी वेगळा आदेश काढलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
छटपूजेच्या निमित्ताने निर्माल्य विसर्जित करण्यासाठी भाविक तलाव, नदीकिनारी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने जमा होत असतात. मात्र, कोरोना या साथीच्या आजारामुळे सण तसेच उत्सवाच्या परवानगीसाठी काही प्रतिबंध घातले आहेत. त्यामुळे छटपूजेनिमित्त एकत्र येण्याला परवानगी दिलेली नसल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकारी याने सांगितले. नागरिकांनीही गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाप्रमाणेेच घरीच छटपूजा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. छटपूजेसाठी अद्याप स्पष्ट आदेश नाहीत. कोरोनासारखा साथीचा आजार लक्षात घेऊन सामाजिक अंतर राखण्यासाठी भाविकांनी एकत्र न येण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
सामूहिक छटपूजेस ठामपाची मनाई
n कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचे सर्वधर्मीय उत्सव साध्या व घरगुती पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेऊन सामूहिक छटपूजेला परवानगी न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यामुळे नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले.n शहरामध्ये उपवन तलाव, कोलशेत विसर्जन महाघाट, रायलादेवी तलाव, दत्तघाट (मासुंदा तलाव), कोपरी खाडी, पारसिक विसर्जन महाघाट, पारसिक रेतीबंदर या ठिकाणी छटपूजेसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केली असून उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.