ठाणे : लग्नापूर्वीच्या संबंधाला विरोध करून वाद घातल्यामुळे योगिता घुंमरे (२२, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाबासाहेब घुंमरे (३३) या पतीला वर्तकनगर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. त्याला २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.बाबासाहेब आणि योगिता यांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांनीच पतीचे लग्नापूर्वीचे एका महिलेशी संबंध असून त्यांना एक ११ वर्षांचा मुलगाही असल्याची माहिती तिला मिळाली. यातून त्यांच्यात अनेकदा खटकेही उडाले. त्याने या महिलेशी संबंध ठेवू नये, असा तिचा आग्रह असतानाही त्यांचे हे संबंध सुरूच असल्याचा तिचा संशय आहे. त्यातच १६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुन्हा बाबासाहेब याच्या मोबाइलवर एका महिलेचा फोन आला. त्याबाबत योगिताने त्याच्याकडे विचारपूस केली. यातून दोघांमध्ये पुन्हा खडाजंगी झाली. या रागातूनच त्याने तिला मारहाण करून किचनमध्ये जाऊन तिच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात ४० टक्के भाजलेल्या अवस्थेत तिला तातडीने प्रथम ठाण्यातील कौशल्या फाउंडेशन रुग्णालयात दाखल केले होते. नंतर, नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याने मात्र पत्नीनेच स्वत: पेटवून घेतल्याचा दावा पोलिसांकडे केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची आणि त्याच्या पहिल्या संबंधाची माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर अधिक तपास करत आहेत.
परस्त्रीशी संबंधाला विरोध केल्याने पतीने केला पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:36 PM
लग्नापूर्वीच एका महिलेशी पतीचे असलेले संबंध पत्नीला माहित झाल्यानंतर तिने या प्रकाराला जोरदार विरोध केला. यातूनच झालेल्या भांडणातून योगिता घुंमरे या विवाहितेला तिचा पती बाबासाहेब याने जाळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार तिने वर्तकनगर पोलीस ठाण्यात केली आहे. तिच्यावर ऐरोलीच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
ठळक मुद्दे ठाण्याच्या लोकमान्यनगरातील घटना पतीला अटकनवी मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरु