मीरारोड - तौत्के चक्रीवादळाच्या गर्तेत अडकलेली भाईंदरच्या पाली गावातील न्यू हेल्प मेरी ही मच्छीमार बोट मंगळवारी रात्री सुखरूप किनाऱ्याला लागली. नाखवा जस्टिन डायमंड मिरांडा यांनी भयावह अशा वादळावर मात करून तीन दिवस भर समुद्रात वादळाशी संघर्ष करत स्वतःसह ५ खलाशी यांचे जीव वाचवत बोटीसह सहीसलामत किनारा गाठला मासेमारी हंगामाचे शेवटचे दिवस असल्याने मच्छीमार मोठ्या आशेने मासेमारीसाठी गेले होते. परंतु तौत्के चक्रीवादळाच्या इशाऱ्याने रविवार पर्यंत भाईंदरच्या उत्तन, पाली व चौक कोळीवाड्यातील सर्वच मच्छीमार बोटी परतल्या. परंतु डायमंड मिरांडा यांची न्यू हेल्प मेरी मच्छीमार बोट मात्र चक्रीवादळात अडकली.
बोटीवर डायमंड यांचा मुलगा जस्टिन मिरांडा हा नाखवा व अन्य ५ खलाशी होते. रविवारी सदर बोट समुद्रातील ओएनजीसीच्या एका वापरात नसलेल्या इंधन विहरीच्या रिंगजवळ होती. त्यावेळी त्यांना तेथेच थांबा किंवा डहाणूचा समुद्र किनारा जवळ असल्याने तेथे आश्रयाला जा अशा सूचना होत्या. परंतु बोट सोडून परतणार नाही असा निश्चय करून जस्टिन हा बोटीसह भाईंदर किनारी येण्यास निघाला. परंतु सोमवारी चक्रीवादळाच्या तुफानाने बोट वादळात ओढली जाऊ लागली. खवळलेल्या समुद्रात बोट वादळामुळे किनाऱ्याच्या दिशेने सरकत नव्हती. नांगर टाकून बोट व स्वतःचे, खलाशी यांचे जीव वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न त्यांचे होते. या दरम्यान वायरलेस वरून तो सतत कुटुंबीय आदींशी संपर्कात होता.
घरच्यांसह कोळीवाड्यात सुद्धा बोटीतील नाखवा व खलाशी सहीसलामत यावेत यासाठी प्रार्थना केली जात होती. तटरक्षक दलाचे हॅलिकॉप्टर बचावासाठी गेले खरे पण प्रचंड वारा असल्याने ते स्थिर राहू शकत नव्हते जेणे करून ते माघारी फिरले. वादळाने खवळलेल्या समुद्रात बोट टिकवून ठेवण्यासाठी तीन नांगर तुटले. शेवटी अन्य दोरखंड एकत्र करून त्याचा वापर केला. बोटीचे स्टिअरिंग बिघडल्याने जस्टिनने खवळलेल्या समुद्रात जाऊन बोटीची दुरुस्ती केली. आता पर्यंतच्या आपल्या आयुष्यात असे चक्रीवादळ कधी पहिले नव्हते. पण माझा मुलगा या भयानक चक्रीवादळावर मात करून स्वतः सह ५ खलाशी आणि बोटीला सहीसलामत परत घेऊन आला हे आम्हा मच्छीमारांसाठी मोठे अभिमानास्पद आहे असे जस्टिनचे वडील डायमंड मिरांडा लोकमतशी बोलताना म्हणाले.