कल्याण : मित्राला सोडून घरी परतणारे सिव्हिल इंजिनीअर तेजस शिंदे (२४) यांचा खड्ड्यांमुळे अपघात होऊन फेब्रुवारीत मृत्यू झाल्यानंतर आता सहा महिन्यांनंतर त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले सार्वजनिक बांधकाम खाते व रस्त्याचा कंत्राटदार यांच्याविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तेजसचे काका संजय शिंदे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.तेजस हा कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात राहत होता. तो १२ फेब्रुवारीच्या रात्री त्याच्या मित्राला घरी सोडण्यासाठी गेला होता. कल्याण-मलंग रोडवरील राधेश्याम इमारतीसमोर रस्त्यावरील नाल्याचे काम सुरू होते. या ठिकाणी एक खड्डा होता. हा खड्डा तेजसला अंधारामुळे दिसला नाही. त्याच्या दुचाकीचे चाक खड्ड्यात आदळून तो खाली पडला. नाल्याचे काम सुरू असल्याने त्यासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी सळया बाहेर आल्या होत्या. त्या तेजसच्या डोक्यात घुसल्या. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या घरच्या मंडळींनी त्याला प्रथम सरकारी रुग्णालयात नेले असता त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला खाजगी रुग्णालयात नेले होते. त्या ठिकाणीही त्याच्यावर उपचार होत नसल्याने त्याला मुंबईतील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. १३ फेब्रुवारी रोजी तेजसवर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तेजसचे काका संजय शिंदे हे पत्रकार असल्याने त्यांनी सर्वप्रथम कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडे त्या कामाबाबत विचारणा केली. महापालिकेकडून माहिती मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. तेव्हा त्यांना कल्याण-मलंग रस्ता हा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतो, असे सांगण्यात आले. शिंदे यांनी त्यांचा मोर्चा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वळवला. त्यांनी सा.बां.कडे पाठपुरावा सुरू केला. माहितीच्या अधिकारात त्या रस्त्याचे काम साई सिद्धी या कंत्राट कंपनीला दिले होते. तब्बल सहा महिने पाठपुरावा केल्यावर शिंदे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.डी. पाटील यांनी तेजसच्या मृत्यूकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग व साई सिद्धी कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला.तेजसचे वडील एमटीएनएलमध्ये कामाला आहेत, तर त्याची आई ब्युटीपार्लर चालवते. त्याचा लहान भाऊ १२ वर्षांचा असून तो शाळेत शिकत आहे. तेजस हा हुशार इंजिनीअर होता. त्याला भाजपा नगरसेवक व बिल्डर मनोज राय यांनी आपल्या कंपनीत नेमले होते. अल्पावधीत त्याचा मृत्यू झाल्याने शिंदे कुटुंबीयांचा हाताशी आलेला तरुण मुलगा त्यांनी गमावला.>तो खड्डा आजही कायमज्या ठिकाणी तेजसला अपघात झाला, त्या ठिकाणी आजही खड्डा तसाच आहे. फक्त सध्या तेथे खड्ड्याभोवती बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. अपघात घडला तेव्हा सा.बां. विभागाच्या अखत्यारीत असलेला हा रस्ता एप्रिल २०१७ पासून महापालिकेच्या कार्यकक्षेत समाविष्ट केला आहे. याच रस्त्यावर मागच्या वर्षी प्राजक्ता फुलोरे या तरुणीचा रस्त्यामुळे जीव गेला होता. त्यानंतरही यंत्रणांनी बोध घेतलेला नसल्याने तेजसचा जीव गेला.या रस्त्याच्या कामासाठी महापालिकेने ४२ कोटी रुपयांचे कंत्राट मंजूर केले आहे. कंत्राटदाराने रस्त्याच्या दुतर्फा गटारे तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. कामाच्या संथगतीविषयी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, पावसामुळे काम सुरू करता आलेले नसल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे आहे.
सहा महिन्यांनंतर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 2:46 AM