- जितेंद्र कालेकरठाणे : ज्या आरोपींना अटकेचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी दिले होते, त्यांच्यासमोर उपनिरीक्षक शारदा देशमुख यांचा त्यांनी पाणउतारा केल्यानेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, देशमुख यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांना काही दिवस आरामाची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरेकर यांनी एका प्रकरणावरून खडसावल्याने नैराश्येपोटी देशमुख यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न १० आॅगस्ट रोजी केला होता. याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले असून दरेकर यांची ठाणे शहर नियंत्रण कक्षात बदली केली.दरम्यान, जानेवारी २०१८ मध्ये दरेकर यांची मुुंबईतून बदली झाली. नियुक्तीनंतर दुसऱ्याच महिन्यात त्यांनी जमादाराला क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ केली होती. त्याने सहायक आयुक्तांकडे तक्रार केल्यावर त्यांची चौकशी झाली होती. तर, अन्य एका प्रकरणात वेतनवाढ का रोखण्यात येऊ नये, अशी नोटीसही वरिष्ठ अधिकाºयांनी बजावली होती. अन्यही एका उपनिरीक्षक महिलेने त्यांची महिनाभरापूर्वीच सहायक आयुक्तांकडे तोंडी तक्रार केली होती. दरम्यान, दरेकर यांचा स्वभाव तापट असला तरी त्यांनी कामाचा एक भाग म्हणूनच उपनिरीक्षक देशमुख यांना आदेश दिले होते. त्यामुळे देशमुख यांनीही सबुरीने घ्यायला हवे होते, अशी चर्चा पोलीस ठाण्यातील अधिकाºयात आहे. एका आरोपीला अटकेच्या सूचना उपनिरीक्षक देशमुख यांना दरेकर यांनी दिल्या होत्या. पण, स्टेशन हाउस ड्युटी असल्यामुळे त्यांनी नकार दिला. यातूनच दरेकर त्यांना रागावले, अशी प्राथमिक माहिती आहे. पण, याप्रकरणी नि:पक्ष चौकशी उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याकडून सुरू असल्याचे ठाणे शहराचे सहपोलिस आयुक्त मधुकर पांडेय म्हणाले.
आरोपींसमोर पाणउतारा केल्यानेच टोकाचे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 5:35 AM