ठाणे : समाजाला विज्ञान, निर्भयता व निती या त्रिसूत्रीचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेला २० ऑगस्टरोजी १० वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु डॉक्टरांच्या मारेकऱी, सूत्रधारांना पकडण्यात पोलीस वा सरकारी यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी ठाण्यात रविवारी जागर फेरीचे आयाेजन केले आहे.
अंनिसच्या ठाणे शहर शाखेच्या कार्यकत्यार्ंकडून डॉ दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी जागर फेरीव्दारे करण्यात येणार आहे. यासाठी ही समाज जागर फेरी टेंभी नाका, कोर्ट नाका येथून सुरू होईल. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास कार्यकत्यार्ंकडून अभिवादन करून फेरीस सुरूवात करण्यात येणार आहे. त्यानंतर ही फेरीन मराठी ग्रंथसंग्रहालय, रेल्वेस्थानक (पश्चिम) डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमीप ५ ते १० मिनिटांचे निदर्शने करून पुढे तेथून मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे या जागर फेरीचा समारोप करण्यात येईल, येथील अंनिसच्या वंदना शिंदे, यांनी स्पष्ट केले.