अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून अवघ्या 100 मीटरवर नगरपालिकेने बेकायदेशीरपणे अनधिकृत रित्या डम्पिंग ग्राउंड उभारले होते या डम्पिंगच्या विरोधात रिक्षा चालक-मालक संघटनेने आज आंदोलन करत पालिका प्रशासनाला हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यास भाग पाडले.
अंबरनाथ शहरातील जोशीकाका रामदास पाटील रिक्षा चालक संघटनेने मंगळवारी रिक्षा बंद आंदोलनाचा इशारा देत आज पालिकेवर धडक मोर्चा काढला. अंबरनाथ नगरपालिकेने स्टेशन जवळील डीएमसी कंपनी जवळ असलेल्या लादी रिक्षा स्टॅन्ड शेजारी अनधिकृत डम्पिंग ग्राउंड तयार केल असून हे डम्पिंग हटवण्यासाठी रिक्षा संघटना आक्रमक झाली. वारंवार पालिकेला निवेदन देऊन देखील पालिका अनधिकृत डम्पिंग बंद करीत नसल्याने रिक्षा चालकांना दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांना बळी पडावे लागले. त्यामुळे संतापलेल्या जोशी काका रिक्षा चालक मालक संघटनेने सोमवारी पालिकेला निवेदन दिल होते. यामध्ये एका दिवसात अनधिकृत डम्पिंग बंद न झाल्यास शहरातील हजारो रिक्षा बंद ठेवून पालिकेवर धडक मोर्चा काढणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज जोशीकाका रामदास पाटील रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वात रिक्षा चालकांनी अंबरनाथ नगर पालिकेवर धडक दिली.
अखेर या प्रकरणी पोलिसांनीही मध्यस्थीची भूमिका बजावत हे अनधिकृत डंपिंग ग्राउंड बंद करण्याबाबत पालिकेने लागलीच निर्णय घ्यावा अशी विनंती केली त्यानुसार अंबरनाथ नगरपालिकेने डम्पिंग ग्राउंड सत्ता बंद करणार असल्याचे लेखी पत्र रिक्षा संघटनेला दिले आहे. तसेच संबंधित जागेवरील संपूर्ण कचरा त्वरित उचलण्यात येईल या पालिकेच्या लेखी आश्वासनानंतर जोशीकाका रामदास पाटील रिक्षा चालक मालक संघटनेने आपले आंदोलन स्थगित केले. यावेळी रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्यासह शेकडोंच्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते. शहरात स्टेशन परिसरात जवळच अनधिकृत डंपिंग उभारणार्या पालिका प्रशासनाला चांगलाच धडा शिकवण्याचे काम रिक्षा संघटनेने केले शहरातील सर्व राजकीय पक्ष निद्रावस्थेत असताना रिक्षा संघटनेने घेतलेला हा पुढाकार खऱ्या अर्थाने नागरिकांसाठी उपयुक्त ठरला आहे.