ठाणे : खारघर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुपर स्पेशलिटी हॉस्पीटलच्या भुमीपुजनाच्या वेळेस वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी शासनाच्या वतीने संपूर्ण एसी मंडपची उभारणी करण्यात आली होती. तसेच याठिकाणी नाष्टा, थंडपेय, पाणी आणि ओआरएसची देखील सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे दिसून आले.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा खारघर येथे आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा भर उन्हात होता, परंतु या सोहळ्यानंतर १३ जणांचा याठिकाणी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर राज्य सरकारवर टीकेची झोड देखील विरोधकांनी उठविली होती. ही घटना ताजी असतांनाच ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयाचा भूमीपूजन सोहळादेखील भर उन्हात आयोजित करण्यात आल्याने त्यावरुन देखील टीका सुरु झाली होती. परंतु यावेळी शासनाने काळजी घेतल्याचे दिसून आले. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याची काळजी घेण्यास राज्य सरकारने सुरुवात केल्याचे चित्र शनिवारी ठाण्यातील कार्यक्रमात दिसून आले.
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर ९०० खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर शनिवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. या सोहळ्यासाठी एक हजार आसन क्षमतेचा मंडप रुग्णालयाच्या मोकळ्या जागेवर उभारण्यात आला होता. या भल्या मोठ्या मंडपात उन्हाची झळ बसणार नाही, याची पुरेपुर काळजी घेण्यात आली होती. याठिकाणी राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींसह, डाॅक्टर, रुग्णालयाचे कर्मचारी, विठ्ठल सायन्ना यांचे कुटुंबीय आणि नागरिक उपस्थित होते. या मंडपात एक हजार नागरिक उपस्थित असले तरी त्यांना उन्हाची झळ बसत नव्हती. याठिकाणी एकूण ३६ वातानुकूलीत यंत्रणा बसविण्यात आल्या होत्या. त्यामुळे मंडपात गारेगार वातारवरण होते. त्याचबरोबर या मंडपामध्ये ओआरएस पावडर, पाणी बाटली आणि नाश्ता अशी व्यवस्था करण्यात आलेली होती. यावेळी बाहेरच्या बाजूस उन्हात उपस्थित असलेल्या पोलिसांसाठी देखील ओआरएस आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर कार्यक्रमाच्या वेळी वाहतुक पोलिसांना मुख्यमंत्र्यांचे हस्ते छत्रीचे वाटप करण्यात आले.