ठाणे : नुकतेच ठाणे महापालिका मार्फत शहरातील महत्वाचे रस्ते सफाईसाठी मागवलेल्या काही गाड्या गुजरात पासिंगच्या असल्याचे धक्कादायक बाब समोर आली होती. हे होत नाही तोच आता एमएमआरडीएमार्फत ठाणे शहरात मेट्रोचे गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. त्या कामासाठी मागवलेली महाकाय क्रेनची गाडी ही गुजरात पासिंगची असल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात गुजरातमधील ठेकेदारांवर इतकी मेहेरबानी का? किंवा जाणूनबुजून गुजराती ठेकेदारांना ही कामे देत दिल्लीश्वरापुढे गुडघे टेकले की काय? असे समजायचं असा सवाल आता ठाणेकर नागरिकांना पडला आहे. ठाणे महापालिकेने ठाण्यातील मोठ्या रस्त्यांची सफाई करण्यासाठी एकूण सहा सफाई यंत्र गाड्या घेण्यात येणार असून त्यापैकी दोन गाड्या महापालिकेच्या ताफ्यात काही महिन्यांपुर्वी दाखल झाल्या आहेत. त्या गाड्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्या गाड्या पालिकेने गुजरात येथील कंत्राटदाराकडून भाडे तत्वावर घेतल्या आहेत. याच गाड्यांवरून वादंग झाला होता. हा वाद शांत होत नाही तोच शुक्रवारी रात्री ठाणे शहरातील कापूरबावडी येथे मेट्रोचे गर्डर टाकण्यासाठी महाकाय क्रेन मागवली होती.
मेट्रोचे काम एमएमआरडीए मार्फत जोरात सुरु आहे. त्या कामासाठी मागवलेली क्रेन ही गुजरात पासिंगची असल्याचे समोर आले आहे. या वरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.तसेच महाराष्ट्र गुजरातला झुकते माप का? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. तसेच काम करताना किमान महाराष्ट्र पासिंगच्या गाड्या वापराव्या, किंवा गुजरात पासिंगच्या गाड्या वापरून राज्य सरकार काय सिद्ध करू पाहत आहे असा सवाल ही ठाणेकर नागरिक विचारत आहेत.