ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी दुपारनंतर परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. ठाणे शहरात सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे नुकसान झाले. तर सखल भागात पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली होती. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत ३१.७५ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर साडेसहापर्यंत ५०.८० मिमी पाऊस पडला. ठाणे शहरासह भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूरमध्येही जोरदार पाऊस बरसला. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी चिंतित आहे. शहापूर तालुक्यातील शेद्रुंणजवळ वीज पडून दिनेश जाधव (३०) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर मुरबाड तालुक्यात चिखले शिरगाव येथील परसू पवार या शेतकऱ्यावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला.
झेनिथ धबधब्यात तरुणी गेली वाहून
रायगड जिल्ह्यात बुधवारी हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ दिला होता. सायंकाळी काही भागात पावसाने हजेरी लावली. यात खोपोली व पालीत ढगफुटीसारखा पाऊस झाला.
खोपोलीत बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे झेनिथ धबधब्यावरून परतणारे सहाजण पाण्याची पातळी वाढल्याने अडकले होते. स्वप्नाली क्षीरसागर (२२) ही नदीमध्ये वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला.
मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहाला वेग होता. क्षीरसागर कुटुंबीय धबधब्यापर्यंत जाऊ शकले नाही; परंतु नदीच्या प्रवाहामध्ये ते अडकले.
पाचच्या सुमारास झेनिथ धबधब्यात सहाजण अडकल्याची माहिती मिळताच त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी गेले. त्यांनी आयेशा शेख, मोनिका क्षीरसागरची सुटका केली. धनंजय क्षीरसागर (भाऊ) हा बॅरिकेड्सला धरून स्वप्नालीसोबत होता; मात्र स्वप्नालीचा हात सुटला आणि ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.
नवी मुंबईला पुन्हा पावसाने झोडपले
नवी मुंबईला बुधवारी दुपारपासून पुन्हा पावसाने झोडपण्यास सुरुवात केली, तर सायंकाळी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने ठाणे-बेलापूर रोडवर लोकमत प्रेस बाहेरील मार्गावर पाणी साचले होते. तुर्भे-महापे रोडवरही ठिकठिकाणी पाणी साचले होते. परिणामी या मार्गांवर वाहतूककोंडी झाल्याने तुर्भे ते शीळफाटापर्यंत वाहतूक मंदावली होती. तसेच सायन-पनवेल महामार्गावरही ठिकठिकाणी पाणी साचले होते. पाऊस असाच सुरू झाला तर बाजार समितीच्या आवक-जावक व्यवहारांवर आज, गुरुवारी परिणाम होण्याची शक्यता आहे.
पालघरमध्ये पावसाचा दुसऱ्या दिवशीही धुमाकूळ
पालघर जिल्ह्यात वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाणगाव रेल्वे स्थानकाच्या ट्रॅकवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची सेवा काही काळ बाधित झाली. जिल्ह्यात सरासरी ४९ मिलिमीटर इतका पाऊस पडला असून सर्वाधिक पाऊस वसई तालुक्यात ८२.६० मिलिमीटर तर सर्वात कमी पाऊस जव्हार तालुक्यात १२ मिलिमीटर इतका पडला आहे.
बुधवारी पहाटेपासून जोरदार सुरुवात केली. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाणगाव स्थानकात रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पहाटे ५ वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत उशिराने सुरू होती. त्यामुळे लांब पल्ल्याच्या अप व डाऊन मार्गावरील गाड्यांसह डहाणू-चर्चगेटपर्यंतच्या लोकलही उशिराने धावत होत्या. त्यामुळे हजारो वीज वितरण ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता.