ठाणे : राज्यातील उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसल्याने ठाणे जिल्ह्यातील तापमानानेही ४२ अंशांपर्यंत मजल मारली. वाऱ्यांचा वेग कमी असला, तरी दुपारी उष्ण वारेही सोबतीला असल्याने काहिलीत भर पडली. ठाण्याचे तापमान ४१ अंशांवर तर ग्रामीण भागांचे तापमान ४२ अंशांवर पोचले होते. ठाणे जिल्ह्यात गेले दोन दिवस रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे. ते सरासरी ३० ते ३१ अंशांदरम्यान गेल्याने रात्रीही या काहिलीतून दिलासा मिळत नाही. उत्तर भारतातून खास करून राजस्थानचे वाळवंट आणि कच्छच्या रणातून उष्ण वारे वाहात आहेत. त्यामुळे राज्यात उष्णतेची लाट आली आहे. ती अजून तीन दिवस तरी कायम राहण्याची शक्यता आहे. परिणामी ठाणे जिल्हाही तापला आहे. यंदा मार्च महिन्याची अखेर आणि एप्रिल महिन्यात किमान दोन वेळा तापमान ४२ अंशावर पोचले होते. त्याचीच पुनरावृत्ती दोन दिवस झाली. ठाणे, कल्याणमध्ये जरी पारा ४१ अंशांवर असला तरी डोंबिवली, बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूरमध्ये तो किमान एका अंशाने अधिक असल्याचे हवामानाच्या नोंदीवरून दिसून आले.या शहरांतील वृक्षतोड जशी याला कारणीभूत आहे, तसेच वाढते औद्योगिकरण आणि नागरीकरणही त्याला जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. तापमानाचा पारा वाढल्याचा तडाखा दुपारच्या प्रवासाला बसतो आहे, तसाच बाजारपेठांनाही बसतो आहे. तापमान जरी सकाळी ११.३० ते दुपारी २.३० या वेळेत अधिक असले तरी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत बहुतांश परिसरात रहदारी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
पुन्हा होरपळ, काहिली आणि तगमग
By admin | Published: April 17, 2017 4:55 AM