- अजित मांडके
ठाणे : मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दीपाली सय्यद या अभिनेत्रीने सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असलेले राष्टÑवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात प्रचार सुरू केला आहे. या मतदारसंघात सिमेंट काँक्रिटचे रस्ते झालेले असले आणि वाहतूककोंडीतून येथील रहिवाशांची सुटका झाली असली, तरी अनधिकृत इमारती, पाणीटंचाई आदी समस्यांची या मतदारसंघात चर्चा सुरू असल्याचे येथे फेरफटका मारला असता जाणवले. अर्थात, सय्यद कळव्यात आपली ओळख दीपाली सांगतात, तर मुंब्य्रात सोफिया.
मुंब्रा-कळवा या मतदारसंघात ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ठिकाणच्या एमआयएमच्या उमेदवाराने अचानक माघार घेतली. वंचित बहुजन आघाडी आणि समाजवादी पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता राष्टÑवादी विरुद्ध शिवसेना अशा दोन प्रमुख पक्षांमध्येच लढत अपेक्षित आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच ‘आप’च्या उमेदवाराला एमआयएमने टाळी दिली. मात्र, त्याचा काही विशेष परिणाम होईल, असे वाटत नाही. सुरुवातीपासून या मतदारसंघात शिवसेनेकडून कोण लढणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, अचानक दीपाली सय्यद या मराठी अभिनेत्रीला उमेदवारी देण्यात आली.
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जितेंद्र आव्हाड यांना आपल्याला यश लाभेल, असा आत्मविश्वास वाटत आहे. कळवा-मुंब्य्रात झालेल्या विकासकामांची पोचपावती म्हणून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन ते प्रचारात करीत असल्याचे त्यांच्या प्रचारात सहभागी झाले असता दिसले. या भागात झालेले सिमेंट काँक्रिटचे रस्ते, सुटलेली वाहतूककोंडी, मुंब्य्रातील फेरीवाल्यांना मिळालेली हक्काची जागा, कबरस्तान, पारसिक चौपाटी, कळवा खाडीवरील तिसरा पूल आदी विकासकामांचा उल्लेख आव्हाड प्रचारसभांमध्ये करतात व मतांचा जोगवा मागतात.
दुसरीकडे दीपाली सय्यद यांच्याकरिता हा मतदारसंघ नवा असल्याने प्रचार कसा व कुठून करावा, याबाबत त्यांची तारेवरची कसरत सुरू आहे. त्यामुळे प्रचारफेºया, रॅली यावर त्यांच्याकडून भर दिला जात आहे. सर्व रॅली फेसबुकवरून लाइव्ह केल्या जात आहेत.नेत्यांची अनुपस्थितीकळव्यात दीपाली नावाने तर मुंब्य्रात सोफिया सय्यद नावाने त्यांचा प्रचार सुरू आहे. परंतु, मतदारांकडे गेल्यावर तुम्हाला या मतदारसंघातील काय माहीत आहे, असा सवाल त्यांना विचारला जात आहे. सेनेच्या प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती खटकणारी आहे.