रस्त्यावर पडलेले खड्डे व दुभाजकाविरोधात; ठामपा मुख्यालयासमोर काॅग्रेसचे आंदोलन
By अजित मांडके | Published: July 31, 2023 02:38 PM2023-07-31T14:38:39+5:302023-07-31T14:40:14+5:30
ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने ठामपा मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : पावसाळ्यात ठाणे महानगर पालिका हद्दीतील जागोजागी पडलेले खड्डे व विविध रस्त्यांवर लावण्यात आलेले अनावश्यक दुभाजक याच्या विरोधात ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने ठामपा मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.
पावसाळा सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच ठाण्यातील विविध महत्वाच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे व यामुळेच होत असलेली वाहतूक कोंडी यामुळे ठाण्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून या विरोधात काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ठामपा मुख्यालयासमोर शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण याच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला. या प्रसंगी प्रदेश सचिव व ठाणे प्रभारी संतोष किणे,काॅग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे,सेवादल अध्यक्ष शेखर पाटील,महिला अध्यक्षा वैशाली भोसले,प्रदेश सदस्य जे.बी.यादव,शकीला शेख,महेद्र म्हात्रे,निशिकांत कोळी,रमेश ईदिसे,प्रवक्ते राहुल पिंगळे,रविंद्र कोळी,मंजूर खत्री,स्वप्नील कोळी,शिरीष घरत,चंद्रकांत मोहीते,प्रकाश मांडवकर आदीसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,पावसाळ्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांसह ठाण्यातील रस्त्यावरील खड्ड्याबाबत पाहणी दौरा झाला होता. मोठ्या प्रमाणात फोटोसेशन करण्यात आले होते, जागोजागी खड्डेमुक्त ठाणे अशा प्रकारचे फलक लावण्यात आले होते. परंतु पहिल्याच पावसात रस्त्यांवरील खड्ड्याबाबत खरे चित्र समोर आले आहे. ठाण्यातील प्रत्येक रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. जिथे जिथे वर्षानुवर्ष पावसाळ्यात पाणी तुंबत होते, तिथे आजही तिच अवस्था आहे. कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता कामे करण्यात आल्यामुळे हि परिस्थिती ओढवली आहे,मुख्यमंत्र्यांना चुकीची माहीती देण्यात येते मुख्यमंत्र्यानी स्वतःच्या वागळे इस्टेट परिसरातील रस्त्यांची पाहणी केली तरी त्याना खरी परिस्थिती लक्षात येईल. ठामपा प्रशासन म्हणते की सर्व चांगले आहे तर आयुक्तांनीच माझ्याबरोबर फिरावे मी त्यांना ठीकठीकानी नेऊन परिस्थिती दाखवेल रस्त्यांच्या कामात १६ टक्के कमिशन घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी याप्रसंगी केला मग दर्जा कसा मिळणार? असा सवालही विक्रांत चव्हाण यानी केला.अनावश्यक ठीकाणी लावण्यात आलेल्या दुभाजकामुळे वाहतूक कोंडी वाढत चालली आहे असेही चव्हाण यानी सांगितले.