ठाणे : कोपरी पूर्व येथे ये-जा करणाऱ्या खाजगी आणि कंपनी बस वाहतुकीविरोधात आतापर्यंत ठाणे शहर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ)अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून दोनदा आंदोलन स्थगित करून सुद्धा अद्यापही कोणत्याही प्रकारे ठोस उपाययोजना हाती घेतल्याचे दिसत नाही. तरी सुद्धा येत्या आठ दिवसात याबाबत योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोपरी संघर्ष समितीने दिला आहे. ठाणे पूर्व येथील सिद्धार्थ नगर ते हसीज कॉर्नर परिसरात मोठ्याप्रमाणात बेकायदा खासगी बसची रेलचेल असते. यामुळे या परिसरात सकाळ व संध्याकाळच्या वेळी वाहतूककोंडीला कोपरीकरांना सामोरे जावे लागत होते. त्यातच या ठिकाणाहून बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या बस सर्वाधिक घोडबंदर ते ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडील भागात हसीज कॉर्नरपर्यंत येत असतात. त्यातच काही दिवसांपूर्वी याच परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या अपघातानंतर कोपरीवासीयांनी एकत्र येऊन या बसविरोधात आक्रमक भूमिका घेऊन तीव्र विरोध दर्शविला. याचदरम्यान, समितीचे आयोजित आंदोलन ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या दालनात झालेल्या चर्चेनंतर स्थगित केले होते. त्यावेळी वाहतूक तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर, पुन्हा १७ एप्रिल रोजी पुन्हा चर्चेसाठी बोलावले जाणार होते. मात्र, अद्यापही तसा काही निरोप आलेला नाही. आठ दिवसांत याबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे. येथे येणाऱ्या किती बस आहेत. कोणत्या आणि कुठून येतात (मुंबई-ठाणे) मग त्या कोपरीतच का येतात याबाबतची माहिती मिळावी अशी मागणी समितीने केली होती. त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे समितीचे विकास चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
खाजगी बसविरोधात कोपरीकर पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात !
By admin | Published: April 20, 2017 4:02 AM