ठाणे - ठाणे पूर्वेतून सुटणाऱ्या खासगी बसेसच्या विरोधात कोपरीतील रहिवासी पुन्हा एकदा एकटवले आहेत. सहा महिन्यांनंतरही ही वाहतूक बंद न झाल्याने आता कोपरी संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाला जाग आणण्यासाठी मंगळवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. यावेळी या बसेसही रोखण्याचा इशारा समितीने दिली आहे.मागील सहा महिन्यांपूर्वी देखील समितीच्या वतीने कोपरी येथून होणा-या खासगी बसेसच्या विरोधात आंदोलन उभारण्यात आले होते. त्यानंतर या बसेस काही दिवसांसाठी का होईना बंद झाल्या होत्या. त्यानंतर वाहतूक पोलीस आणि संबंधित आरटीओ प्रशासनाने देखील यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज सहा महिने उलटून गेल्यानंतरही याच्या विरोधात कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. उलट आता तर या बसेसवाल्यांची मुजोरी आणखीनच वाढली आहे. सरकार दरबारी या गंभीर समस्येची दाद मागत असताना ब-याच बैठका संघर्ष समिती व प्रशासकीय अधिका-यांसोबत झाल्या. परंतु आश्वासनांच्या पलीकडे दुसरे काहीच मिळाले नसल्याचे समितीने सांगितले आहे.त्यामुळेच आता पुन्हा संबंधित प्रशासनाला जाग येण्यासाठी एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचे हत्यार उपसण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली. या उपोषणाच्या माध्यमातून काही मागण्या देखील केल्या जाणार असून यामध्ये अवैध बस व जीप, मोटर वाहतूक फक्त कोपरीतूनच नव्हे तर संपूर्ण ठाण्यातूनच बंद व्हावी, परवानाधारक कंपनी बसेसच्या आड जी अवैध वाहतूक चालते त्याला ही चाप बसावा, कोपरी वाहतूक पोलीस शाखेची चौकी अथवा संपूर्ण कोपरी वाहतूक पोलीस ऑफिस हे गावदेवी बस थांबा, साईबाबा मंदिराजवळ शिफ्ट करावे, परवानाधारक कंपनी बसेस ने त्यांच्या कंपनीचे नाव, त्याच बरोबर प्रवास करणा-या कंपनी कामगारांनी कंपनीचे ओळखपत्र दिसेल अशा स्वरूपात बस मधून चढताना, उतरताना बाळगावे, परवानाधारक कंपनीच्या बसेसचे बस क्रमांक, कंपनीचे नाव, पीकअप आणि ड्रॉपची वेळ ही एका मोठ्या बोर्डवर गावदेवी बस थांब्या जवळ लावावी,प्रादेशिक परिवहन विभाग व ठाणे वाहतूक पोलीस शाखेने सातत्याने आलटून पालटून या खासगी कंपनी बसेसच्या कागदपत्रांची तपासणी करावी, जेणेकरून सर्व बस चालकांना कायद्याच्या धाकाने शिस्त लागेल, या मागण्यांसदर्भात चालढकल करण्यात आली तर यापुढील कोपरी संघर्ष समितीचे आंदोलन हे अतिशय उग्र स्वरूपाचे असेल ज्याची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल असा इशाराही समितीच्या वतीने विनोद मोरे, नितीन पाटील, रवींद्र मोरे, राजेश गाडे आदी समिती सदस्यांनी दिला आहे.
खासगी बसेसच्या विरोधात कोपरीकरांचा पुन्हा एल्गार, मंगळवारी रोखणार वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 3:34 PM