कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी उशिरा का होईना केडीएमसीने पावले उचलली आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात अडीच टक्के फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी प्रभागांमध्ये पांढरे पट्टे मारले जात आहेत. परंतु, डोंबिवलीत फेरीवाला संघटनांनी या धोरणाचे स्वागत केले असताना कल्याणमध्ये मात्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांच्या दालनात गुरुवारी विशेष बैठक होणार आहे. त्यात कोणता तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे.कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये फेरीवाला अतिक्रमणाचा मुद्दा गाजत आहे. फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आजवर कोणतीही ठोस कृती केडीएमसीकडून झालेली नव्हती. एल्फिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार फेरीवाल्यांना रेल्वेस्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास मनाई आहे. केडीएमसी हद्दीतील अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर इतरत्र कारवाई सुरू असताना डोंबिवली पूर्वेकडील रेल्वेस्थानक परिसरात मात्र फेरीवाल्यांची मुजोरी कायम आहे. यात महापालिकेच्या पथकांसह फेरीवाला हटवण्यासाठी आग्रही असलेली मनसेही थंड पडल्याचे चित्र आहे. केडीएमसीविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची मनसेची घोषणाही हवेत विरली आहे.केडीएमसीने निश्चित केलेल्या ३७ हॉकर्स झोनमध्ये स्थलांतरित करा, अन्यथा तोपर्यंत आम्ही आहोत तिथेच व्यवसाय करू, असा पवित्रा रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांनी घेतला आहे. परंतु, आता केडीएमसीने उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पुनर्वसनाला सुरुवात केली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात अडीच टक्के फेरीवाले असतील, असे धोरण राबवण्यास प्रारंभ केला आहे. त्यादृष्टीने डोंबिवली पूर्वेकडील टाटा पॉवर लाइनखालील रस्ता तसेच अन्य प्रभागातील रस्त्यांवर पांढरे पट्टे मारले आहेत. तेथे लवकरच फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. डोंबिवलीतील कष्टकरी हॉकर्स भाजीविक्रेता संघटनेने या धोरणाचे स्वागत केले आहे. रेल्वेस्थानक परिसरात कारवाई चालू असताना आम्ही पुनर्वसनाची मागणी लावून धरली होती. महापालिकेने आता जी कृती सुरू केली आहे, ती निश्चितच स्वागतार्ह आहे. सर्व फेरीवाल्यांना व्यवसाय करता यावा, हीच आमची मागणी असल्याचे संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी सांगितले.
पुनर्वसनाला फेरीवाल्यांचा विरोध'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 12:48 AM