ठाणे : सर्वसामान्यांचा विरोध असतांनाही टोरण्टची वीज कळवा, मुंब्रा, दिवा, शीळ - डायघर परिसरावर जबरदस्तीने लादली जात आहे. मात्र, त्यांचा हा प्रयत्न आम्ही उधळून लावणार असल्याचा इशारा मंगळवारी राष्ट्रवादीने दिला. आधी जनसुनावणी घेऊन जनसामान्यांचे ऐकून घेऊ असे सांगण्यात आले होते. परंतु, तसे काहीच न करता जबरदस्तीने टोरेन्ट लादली जात असल्याचा आरोपही यावेळी राष्ट्रवादीने केला.कळवा- मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर परिसरात वीजवितरणाचे खासगीकरण करून टोरेन्ट कंपनीला लादले जात आहे. त्या विरोधात राष्ट्रवादीने एल्गार पुकारला. मंगळवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस सय्यद अली अश्रफ, कळवा-मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान, कळवा-मुंब्रा विधानसभा युवाध्यक्ष शानू पठाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन दिले. कळवा-मुंब्रा-शीळ मधील वीजग्राहकांनी तीव्र विरोध दाखवल्यानंतरही या विभागाचे खासगीकरण झाले असून टोरेन्ट पॉवर कंपनीला या परिसरात वीजवितरणाचे हक्क पुढील २० वर्षांसाठी देण्यात आले आहेत. या परिसरातील वीजवितरणाचे खाजगीकरण केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून या खाजगीकरणाला विरोध केला जात होता. मात्र, खासगीकरणाला होणारा विरोध डावलून महावितरणने शीळ, मुंब्रा आणि कळवा या परिसराच्या वीजवितरणाचे काम टोरेन्ट पॉवर कंपनीला पुढील २० वर्षांसाठी दिले आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे. २४ जूनपर्यंत जर टोरेन्टचा ठेका रद्द केला नाही तर २५ जून रोजी कळवा- मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर बंद करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
टोरण्ट विरोधात राष्ट्रवादी पुन्हा पुकारणार एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 1:22 AM