ठाणे - नव्या वर्षात आता ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनेल पाहण्याची आणि जेवढे चॅनेल पाहतोय त्याचेच पैसे देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. परंतु ट्रायच्याय ा निर्णया विरोधात सोमवारी ठाणे जिल्हा केबल सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे एक निवदेनही देण्यात आले असून केबल चालकांना ४० टक्के कमीशन मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. येत्या १ जानेवारी पासून ग्राहकांना आपल्या आवडीची वाहीन्या बघण्याची संधी मिळणार आहे. सध्या ठाणे किंवा इतर ठिकाणांचा विचार केल्यास या भागांमध्ये केबल आॅपरेटर मोठ्या संख्येने कार्यरत आहे. केवळ ठाण्यातच ३५० च्या आसपास केबल आॅपरेटर असून त्यामध्ये १ हजारांच्या आसपास कामगार काम करीत आहेत. तर ठाण्यात केबल ग्राहकांचे २ लाखांच्या आसपास जाळे पसरले आहे. परंतु या नव्या धोरणानुसार केवळ ग्राहकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचाच प्रयत्न असल्याचा दावा ठाणे जिल्हा केबल सेनेने केला आहे. ग्राहकांना साधे बेसीक चॅनेल बघायचे असतील तरी सुध्दा हा खर्च ४८० रुपयांच्या आसपास जाणार आहे. त्यामुळे आता नव्या धोरणानुसार जास्तीचे पैसे ग्राहकांना मोजावे लागणार असून केबल आॅपरेटवाल्यांचेही नुकसान होणार असल्याचे मत ठाणे जिल्हा केबल सेनेचे अध्यक्ष मंगेश वाळुंज यांनी व्यक्त केले आहे. या नव्या धोरणानुसार केबल आॅपरेटरला यामधून केवळ १० टक्केच कमीशन मिळणार आहे. जे १० टक्के कमीशन मिळणार आहे. त्यातून कामगारांचे पगार द्यायचे कसे, तांत्रिक दुरुस्तीची कामे असतात, नवीन तंत्रज्ञान विकसित होत असते, त्याचा खर्च भागवायचा कसा असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे. तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेले हजारो कुटुंबे बेघर होतील अशी भितीही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
केंद्राच्या ट्रायच्या नियमावलीमुळे केबल आॅपरेर्टसचे नुकसान होणार आहे. केवळ रोजगाराच्या माध्यमातून हे आॅपरेटर काम करीत होते. त्यात मिळणारे उत्पन्न ही कमी आहे. त्यात आता नव्या धोरणानुसार उत्पन्नात आणखी कमी होणार आहे. या सर्वांवर उपासमारीची वेळ येणार आहे. भविष्यात ट्रायने या केबल आॅपरेटवर अन्याय होणार नाही, त्या दृष्टीने केंद्राने यात मध्यस्ती करुन योग्य तो तोडगा काढला पाहिजे.(प्रताप सरनाईक - आमदार, शिवसेना)
कमीत कमी ४० टक्के कमीशन मिळावे अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. परंतु यावर योग्य तो तोडगा निघाला नाही तर मात्र नव्या वर्षात पुन्हा यापेक्षाही गंभीर आंदोलन उभारले जाईल.(मंगेश वाळुंज - अध्यक्ष - ठाणे जिल्हा केबल सेना)