भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आस्थापनेवर तात्पुरत्या स्वरुपात ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या संगणक चालकांनी सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी २२ जानेवारीपासुन कामबंद आंदोलन सुरु केले आहे. त्या संगणक चालकांनी पालिकेला कोणतीही पुर्व सूचना न देता सुरु केलेल्या आंदोलनाप्रकरणी प्रशासनाने नोटीस बजावली असुन त्वरीत कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
पालिकेने कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या ६८ संगणक चालक व १ लघुलेखकाला २००७ मध्ये ठोक मानधन पद्धतीनुसार पालिका आस्थापनेवर तात्पुरत्या स्वरुपात सामावुन घेतले आहे. गेल्या १० वर्षांपासुन ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या संगणक चालकांनी कायमस्वरुपी सेवेत सामावुन घेण्यासाठी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा सुरु केला. त्यावर प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने १९ मे २०१७ रोजीच्या महासभेत त्या संगणक चालकांना सेवेत कायम करण्याच्या ठरावाचे वाचन करुन त्याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली. त्यावेळी प्रशासनाने त्यात कोणताही आक्षेप वा त्रुटी काढली नाही. त्यानंतर २६ डिसेंबर २०१७ रोजी प्रशासनाने परस्पर तो मंजुर ठराव राज्य सरकारकडे रद्द करण्यासाठी पाठविला. प्रशासनाने त्याची पुर्वसूचना महापौर व महासभेला दिली नाही. त्यावर संगणक चालकांनी आ. नरेंद्र मेहता प्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातुन २९ डिसेंबर २०१७ रोजी प्रशासनाला पत्रव्यवहार करुन त्यात प्रशासनाने संगणक चालकांच्या कायमस्वरुपी सेवेत सामावुन घेण्याचा मंजुर ठराव राज्य सरकारकडे पाठविला आहे, तो त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. त्याअनुषंगाने महापौर डिंपल मेहता यांनी देखील प्रशासनाला पत्रव्यवहार करुन संगणक चालकांची मागणी मान्य करण्याची सूचना प्रशासनाला केली. त्यावरही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने संघटनेने ४ व २० जानेवारी रोजी पुन्हा प्रशासनाला पत्रव्यवहार करुन मागणी मान्य करण्याची विनंती केली. त्याचीही दखल प्रशासनाने न घेतल्यामुळे अखेर कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आल्याचे संगणक चालकांकडुन सांगण्यात आले. याप्रकरणी प्रशासनाने संगणक चालकांना नोटीस पाठवुन त्यात प्रशासनाला आंदोलनाची कोणतीही पुर्वसूचना दिली नसल्याबाबत नमुद करण्यात आले असुन ते दिशाभूल करणारे असल्याचा आरोप संगणक चालकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने संगणक चालकांना बजावलेली नोटीस तसेच राज्य सरकारकडे रद्द करण्यासाठी पाठविलेला मंजुर ठराव त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी करीत संगणक चालकांनी दुसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन सुरुच ठेवले.
प्रशासनाने संगणक चालक व लघुलेखक यांना जोपर्यंत सेवेत कायमस्वरुपी सामावुन घेत नसल्याचे स्पष्ट करीत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरुच राहणार आहे.
- श्रमिक जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रभाकर गायकवाड
संगणक चालकांनी अगोदर कामावर हजर व्हावे. त्यानंतर चर्चेद्वारे निर्णय घेतला जाईल. अन्यथा त्यांची सेवा खंडीत केली जाईल.
- पालिका उपायुक्त (मुख्यालय) विजयकुमार म्हसाळ