अंबरनाथ : बांगलादेशींना भारतीय ओळखपत्रे पुरवणाऱ्या एका एजंटला एटीएसने बेड्या ठोकल्या. भारतात बंदी घालण्यात आलेल्या बांगलादेशी संघटनेच्या एजंटला एटीएसने अंबरनाथमधून अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सुुरू असतानाच नवी मुंबई एटीएसला या एजंटबाबत माहिती मिळाली होती. त्याने बांगलादेशी नागरिकांना पॅन कार्ड तयार करण्यासाठी तहसीलदार कार्यालयातून बनावट प्रतिज्ञापत्र मिळवल्याचा आरोप आहे. अंबरनाथमधील काही एजंट बांगलादेशी नागरिकांना भारतातील ओळखपत्र तयार करून देण्यासाठी मदत करत असल्याचा सुगावा लागल्याने ही कारवाई करण्यात आली.एटीएसने अंबरनाथमधून बांगलादेशी संघटनेशी संबंधित असलेल्या आणि मूळच्या बांगलादेशचा रहिवासी असलेल्या आरोपीला अंबरनाथमधून अटक केली होती. त्यातूनच अंबरनाथमध्ये बांगलादेशी पाळेमुळे रोवत असल्याचे समोर आले होते. बांगलादेशी आरोपींकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड सापडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच नवी मुंबई एटीएसनेही अंबरनाथमध्ये कारवाई केली. पॅन कार्ड आणि आधार कार्ड काढण्यासाठी लागणारे प्रतिज्ञापत्र चुकीच्या मार्गाने मिळविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते. काही बांगलादेशी नागरिकांनी पॅन कार्ड तयार करण्यासाठी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयातून बनावट प्रतिज्ञापत्र मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एटीएसने गुन्हा दाखल करत ८३ प्रतिज्ञापत्रधारकांची यादी मागवत प्रवीण पाटील या एजंटला अटक केली आहे.महिनाभरापूर्र्वी मुंबई येथून बांगलादेशी संघटनेच्या काही लोकांना अटक करण्यात आली होती. त्याचे धागेदोरे नवी मुंबईत कामोठे येथे सापडल्याने तेथूनही आठ ते दहा बांगलादेशी कामगारांना एटीएसने ताब्यात घेतले होते. मात्र याच तपासात पॅन कार्ड तयार करण्यासाठी काही बांगलादेशी नागरिकांनी एका एजंटमार्फत अंबरनाथ तहसील कार्यालयाच्या सेतूमधून बनावट अॅफिडेव्हिट तयार केल्याचे समोर आले. या प्रकरणी नवी मुंबई एटीएस युनिटने अंबरनाथ तहसील कार्यालयाच्या सेतू कार्यालयातून ८३ अॅफिडेव्हिट ताब्यात घेतले. याच प्रकरणात प्रवीण पाटील या एजंटला अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणात सेतू कार्यालयातील तीन लिपिकही संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. त्यांना तहसीलदारांमार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या कामाचा अहवाल एटीएसला पाठवण्यात येणार असून, त्यांची एटीएसमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे एजंट आणि सेतू कार्यालयातील कर्मचाºयांतील संबंधाचा फायदा घेत बांगलादेशी नागरिकांना पॅन कार्ड काढण्यासाठी मदत केली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी येत्या काही दिवसात काही बांगलादेशींच्या बनावट ओळखपत्रांबाबत मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. याबाबत एटीएसच्या नवी मुंबई युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांना विचारले असता, प्रवीण पाटील याला अटक करण्यात आल्याचे सांगितले.
बांगलादेशींना ओळखपत्रे पुरवणारा एजंट अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 2:31 AM