ठाणे - स्वा.सावरकर नगर परिसरात सर्वच सुलभ शौचालयाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे त्याचा नाहक त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. अखेर सोमवारी रात्रीच्या सुमारास येथील महिलांनी आक्रमक पावित्रा घेत येथील सुलभ शौचालयाला टाळे ठाकले आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शौचालयांची दुरुस्ती, निगा देखभाल आदींची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार ८० टक्याहून अधिक कामे झाली असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. यासाठी कोट्यावधींचा निधी देखील राज्य शासनाकूडन महापालिकेला उपलब्ध झाला आहे. परंतु असे असतांनाही शहरातील अनेक भागात शौचालयांची दुरावस्था झाल्याचे चित्र दिसत आहे.
सावरकर नगर भागातील शौचालयांच्या दुरावस्थेचा पाढाच येथील महिलांनी वाचला आहे. शौचालयात पाणी नाही, दरवाजा नाही, नळ नाही, महिला शौचालयात व्यसन करणारी मुले असतात, केयरटेकर नाही अशा वेळी स्लम वस्ती (चाळीतील लोकांनी) करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे हे घोषवाक्य फक्त कागदावरच आहे. खरे तर वस्तुस्थिती तशी नाही खूप बिकट अवस्था आहे. ठा.म.पा. चा निधी फक्त नवीन आर.सी.सी. रस्ते निकामी करण्यात टाकतात.गार्डनसाठी देतात परंतु अशा ठिकाणी पैसा खर्च का करीत नाही असा सवाल येथील रहिवाशांनी केला आहे. संपूर्ण सावरकरनगरात प्रचंड नाराजी असून सुलभ शौचालय व पाणी वेळेवर नाही खूप त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधीवर आता विश्वासच राहिला नाही. अशी तीव्र प्रतिक्रिया रहिवाशांमध्ये उमटत आहे. अखेर या नाराजीच्या माध्यमातूनच महिलांनी रात्री येथील सुलभ शौचालयालाच टाळे ठोकले आहे.