डोंबिवली: सततच्या वीज खंडित होत असल्याच्या कारणावरून येथील एमआयडीसीमधील महावितरणच्या कार्यालयावर गुरुवारी एकत्र येत नागरिकांनी धडक मारून उपकार्यकारी अभियंता यांना त्याबद्दल जाब विचारला. बुधवारी तीन जून सकाळी साडेदहा पासून वादळाचे कारण सांगून वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. परंतु सायंकाळ पर्यंत वीजपुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांनी महावितरणचा अभियंताना फोन केले असता त्यांच्याकडून काहीही प्रदिसाद मिळेना शिवाय मेसेज पण येत नव्हते त्यामुळे नागरिक चिडले होते.
रात्री दहाचा दरम्यान काही ठिकाणी वीज आली पण काही ठिकाणी आज गुरुवार दुपारी एक वाजेपर्यंत वीज आली नव्हती. गेल्या अनेक दिवसांपासून निवासी परिसरात वीजपुरवठा बंद होण्याचे प्रमाण वाढले असून केबल फॉल्ट, ट्रान्सफॉर्मरला आगी लागणे, स्पार्क होणे, ट्रान्सफॉर्मर मधुन स्फोटासारखा आवाज येणे अशा अनेक कारणांमुळे वीजप्रवाह जात आहे.
महावितरणचा एमआयडीसी कार्यालयाचा आवारात अनेक वर्षांपासून दर वर्षी पाणी भरते त्यामुळे वीज ग्राहकांना व कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. यावरही महावितरण काहीही करीत नाही. आज उत्स्फूर्तपणे नागरिकांनी लॉकडाऊन असूनही त्रासपोटी महावितरण कार्यालयावर येऊन त्यांनी आपला राग व्यक्त केला. सदर प्रसंगी धर्मराज शिंदे, नंदू परब, राजू नलावडे, करिष्मा प्रताप, उल्हास सावंत, रामदास मेंगडे, मोहन पुजारे, मनोहर पाटील, माटल, दुर्वाकुर जोशी इत्यादी महिला पुरुष उपस्थित होते.
200 घरांमध्ये बुधवारी रात्री वीज पुरवठा खंडित झाला होता, पण रात्री उशिरा तो फॉल्ट कळल्याने त्याची दुरुस्ती करता आली नाही, गुरुवारी सकाळी 9।30 नंतर ते काम हाती घेण्यात आले, आणि त्यानंतर दुपारी तेथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला : नितेश ढोकणे, सह अभियंता, महावितरण