अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेचे अनधिकृत डम्पिंग ग्राऊंड तत्काळ बंद करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र मागणीचा कोणताच विचार होत नसल्याने डम्पिंगचा त्रास सहन करणाऱ्या रहिवाशांनी संघर्ष समिती स्थापन करुन डम्पिंगच्या विरोधात निदर्शने सुरु केली आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन डम्पिंग ग्राऊंडच्या विरोधात निदर्शने केले. तसेच या पुढे डम्पिंगवर एकही गाडी येऊ देऊ नये अशी मागणी केली. अंबरनाथ फॉरेस्ट नाका येथे पालिकेचे डम्पिंग ग्राऊंड असून गेल्या 25 वर्षापासून याच ठिकाणी शहरातील कचरा टाकला जात आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून या डम्पिंगवर लागणारी आग नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. सतत हा प्रकार घडत असल्याने दुर्गंधीचा आणि डंपिंगच्या धुराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या डम्पिंग ग्राऊंडविरोधात ग्रीन सिटी, हरी ओम पार्क आणि मोरीवली पार्क भागातील रहिवासी एकवटले असून त्यांनी डम्पिंगविरोधात संघर्ष समिती तयार केली आहे. या समितीच्या माध्यमातून डम्पिंगविरोधात आंदोलने केली जात आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून रविवारी सर्व नागरिकांनी एकत्रित येत कडाडून विरोध केला. डंपिंगवर कचरा टाकू देणार नाही अशी ठाम भूमिका या संघर्ष समितीमार्फत घेण्यात आली आहे. संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात शेकटो रहिवासी सामिल झाले होते. राजकीय पक्षांची मदत न घेता नागरिकांनी एकत्रित येऊन या डम्पिंग ग्राऊंडवर निदर्शने करत प्रशासनाचा निषेध केला.मुळात ज्या सोसायटींना या डम्पिंगचा त्रास होत आहे, त्या सोसायटीने आपला लढा सुरु करताना हे डंपिंग ग्राऊंड अनधिकृत असल्याचे कारण पुढे केले आहे. डम्पिंगचे आरक्षण ज्या जागेवर आहे, त्याच ठिकाणी कचरा हलवण्यात यावा अशी मागणी केली आहे. पालिकेमार्फत सुरु असलेले डम्पिंग ग्राऊंड अनधिकृत असल्याने पालिकेने या ठिकाणी कचरा टाकू नये अशी भूमिका निदर्शनकर्त्यांनी घेतली आहे. मोरीवली पाड्यातूनच हे आंदोलनकर्ते डंपिंग ग्राऊंडपर्यंत पोहोचले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. डम्पिंगरील त्रसाची जाणिव पालिकेला झाल्यावर पालिकेने त्या ठिकाणी माती भराव टाकण्याचे काम सुरु केले आहे. मात्र त्रास अजुनही कमी झालेला नाही.
डम्पिंग ग्राऊंडविरोधात रहिवाशांची निदर्शनं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 10:38 PM