डोंबिवली: तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने घंटागाडी, आरसी वाहन कर्मचा-यांनी डोंबिवलीत अचानकपणे आंदोलन करत कचरा न उचलण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे बुधवारी सकाळच्या पहिल्या सत्रात शहरात जागोजागी कच-याचे ढीग झाले होते. त्याची गंभीर दखल घेत आयुक्त गोविंद बोडके यांनी खंबाळपाडा येथे जात आंदोलनकर्त्या कर्मचा-यांची भेट घेत त्यांना खडे बोल सुनावले. तसेच विशाल एक्स्पर्ट सर्व्हस या कंपनीशी चर्चा करत कामगारांचे थकलेले वेतन संध्याकाळपर्यंत तातडीने द्यावे, अन्यथा कायद्याचा बडगा उगारावा लागेल अशी तंबी दिली. त्यामुळे आयुक्तांच्या आश्वासनानंतर त्यांनी तीन तासानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे सांगत, पगार न झाल्यास पुन्हा कामबंदचा इशाराही देण्यात आला.महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. ऐन सणाउत्सवांच्या काळात जनतेला वेठीस धरणे उचित नाहीच, त्यातही महापालिकेने तुमचे पगार अडवलेले नसून ती जबाबदारी ही ठेकेदाराची आहे. त्यामुळे तातडीने कामावर हजर व्हा, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल असे आयुक्त बोडके म्हणाले. या कंपनीने येथील ४०० कर्मचा-यांचे तीन महिन्यांचे पगार थकवले आहेत, त्यात १२० वाहक, आणि २८० सफाई कामगारांचा समावेश असून त्यासगळयांचे वेतन थकवल्याची माहिती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश उज्जेनकर यांनी दिली. यावेळी विरोधी पक्षनेते मंदार हळबे, संघटनेचे कार्यकारणी सदस्य ओम लोके आदींसह अन्य पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सकाळी सहापासून सुरू झालेल्या आंदोलनात डोंबिवलीत, आणि नंतर कल्याणात कुठेही कचरा न उचलण्याचा पावित्रा घेत आंदोलक कर्मचा-यांनी खंबाळपाडा येथे ठिय्या आंदोलन केले. तसेच तेथील आरसी मोठ्या कचरा वाहक वाहनांच्या टायरची हवा काढली. त्यामुळे महापालिकेच्या संपत्तीचे नुकसान करण्याचा कोणताही अधिकार कर्मचा-यांना नाही असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. पगार मिळायलाच हवा, तोही वेळेतच या भूमिकेशी आम्हीही सहमत आहोत, पण त्यासाठी रितसर मागणी करणे अपेक्षित होते. नाहक जनतेला वेठीस धरून काहीच साध्य होणार नाही हे सगळयांनी जाणून घ्यावे. संबंधित ठेकेदाराच्या मालकालाही आयुक्त बोडके यांनी बोलावून घेणार असल्याचे सांगितले. खंबाळपाडा येथे जाऊन त्यांनी आंदोलन कर्त्यांशी चर्चा केली, आणि तात्काळ आंदोलन मागे घ्यावे असे सांगितले. पगार संध्याकाळपर्यंत होण्याचे आश्वासन मिळाले असून तात्पुरत्या तत्वावर आंदोलन मागे घेत असून तातडीने शहरातील कचरा गोळा करण्याचे काम सुरू करण्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
पगार देणे ही संबंधित ठेकेदाराची जबाबदारी होती, त्यांना टेंडर देतांना अटीशर्थींमध्ये त्यासंदर्भात स्पष्ट सूचित केलेले असते. त्यामुळे त्याचे पालन ठेकेदाराने करायचे असते. पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने त्यासंदर्भात ठेकेदाराला त्याचा निधी देताना काही मागेपुढे झाले असेलही, पण त्याबाबतही आयुक्त गोविंद बोडकेंसमवेत चर्चा करणार आहे. पण कोणीही जनतेला वेठीस धरणे, वाहनांचे नुकसान करणे योग्य नाहीच - विनिता राणे, महापौर, केडीएमसी