डोंबिवली : पहिल्या पावसातच नांदीवली येथील श्री स्वामी समर्थनगर येथे कंबरभर घाण पाणी साचल्याने नागरिकांना बोटीने मार्ग काढण्याची स्थिती निर्माण झाली होती. महापालिकेला कर भरणाऱ्या नागरिकांची ही शोकांतिका असून, महापालिका आयुक्त करतात तरी काय, असा सवाल आमदार राजू पाटील यांनी केला. आठवडाभरात या समस्येवर तोडगा न निघाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना त्याच पाण्यात बुडवण्याचा मनसेस्टाइल इशारा त्यांनी दिला.
बुधवारच्या पावसात नांदीवलीच्या टेकडीखालील बहुतांश भाग पाण्याखाली गेला. शेकडो रहिवासी अडकून पडले. या नागरिकांची व्यथा जाणून घेण्यासाठी आ. पाटील हे गुरुवारी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी गेले होते. त्यावेळी रहिवाशांसमवेत त्यांनी चर्चा केली. नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. त्यावर निरुत्तर झालेल्या अधिकाऱ्यांना पाटील यांनी खडे बोल सुनावले. गेल्यावर्षीच या समस्येवर तोडगा काढण्याचे ठरले होते. वर्ष झाले पण काहीच केले नाही, हे योग्य नसल्याचे सांगत पाटील संतापले. आयुक्त करतात तरी काय, निधी का देत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार यांनाही रहिवाशांनी धारेवर धरले. बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, विभागीय उपअभियंता किरण वागणारे, जल व मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत मातगुंडी, कनिष्ठ अभियंता लीलाधर नारखेडे आदींवरही नागरिकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. पाटील यांनी या कामासाठी १० लाखांच्या ५ फाइल बनवून आमदार निधी वापरण्याच्या सूचना केल्या. यावेळी मनसे शहराध्यक्ष मनोज घरत, माजी नगरसेवक हर्षद पाटील यांच्यासह विविध सोसायट्यांचे रहिवासी उपस्थित होते.
-----------------
फोटो आहे