ठाणे : महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले मोठमोठे प्रकल्प परराज्यात म्हणजे परस्पर गुजरातला पळवण्यात येत असल्याचा आरोप करीत त्याविरोधात येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. दरम्यान या कार्यकर्त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाणे नगर पोलिसांनी हा पुतळा वेळीच जप्त केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.
येथील शासकीय विश्रामगृहासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी हे आंदोलन छेडण्यात आले. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे-फडवणीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे जोरदार आंदोलन आज छेडले.
यावेळी कार्यकर्त्याकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शिंदे-फडणवीस आणि मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्राचे प्रकल्प पळवणार्या गुजरातचा निषेध म्हणून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाला. उद्योगाचे विमान गुजरातला, बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला" हे धोरण शिदे-फडणवीस सरकारने आखले असून त्यास मोदींचा पाठिंबा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या पुढे जर असे प्रकल्प पळविले तर या सरकारला जनता पळवून लावेल, असा इशारा खामकर यांनी दिला.
या आंदोलनात राष्ट्रीय सचिव राष्ट्रवादी युवकचे राष्ट्रीय सचिव मोहसीन शेख, प्रफुल कांबळे, गजानन चौधरी,अभिषेक पुसालकर , संतोष मोरे,श्रीकांत भोईर,संदीप येताल,आकाश पगारे,सिदिक शेख,जितेश पाटील,संकेत पाटील,सुनील निषाद,अमित लगड,अमित खरात, अमोल गायखे,सोनू,सकपाळ, फिरोज पठाण,दिनेश सोनकांबळे,महेश सिंह,भावेश धोत्रे,महेश यादव,साई भोगवे,दौलत समुखे,भारत पवार, विषांत गायकवाड सहभागी झाले होते.