मीरारोड - काशीमीरा परिसरातील विविध आदिवासी पाड्यां मधील सुमारे ४५१ आदिवासींचे वन हक्क दावे केवळ महापालिका आवश्यक नोंदींवर कार्यवाही करत नसल्याने रखडले आहेत असा आरोप करत गुरुवारी श्रमजीवी संघटनेच्या वतीने पालिका प्रभाग समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले .
मीरा भाईंदर महापालिका हद्द व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारीत काशीमीरा परिसरात माशाचा पाडा, दाचकूल पाडा, बाभळीचा भाट, मांडवी पाडा, म्हसकर पाडा असे लहान मोठे सुमारे १५ आदिवासी पाडे आहेत. ह्यातील अनेक आदिवासी हे आजही जंगलपट्टीवर अवलंबून आहेत . वन हद्दीत ते लाकडे गोळा करून आणण्या पासून शेती , फळझाडे - भाज्या लावणे आदी गोष्टी करून उपजीविका चालवत आहेत .
वन हक्क मिळावा म्हणून आदिवासींनी विविध शासकीय व महापालिका पातळीवर अर्ज केले आहेत . श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आदिवासींना वन हक्क मिळावा यासाठी पाठपुरावा केला जात आहे . ठाणे जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांना या भागातील सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्या नंतर तलाठी यांना अर्ज भरण्यासाठी महापालिकेतील काही नोंदी गरजेच्या आहेत . त्या नोंदी मिळाव्यात म्हणून महापालिकेत अर्ज करून सुद्धा अद्याप कार्यवाही केली जात नसल्याचा श्रमजीवी संघटनेचा आरोप आहे . तर अनेक आदिवासी अर्जदारांच्या विहित नमुन्यात अर्ज भरताना काही त्रुटी असल्याने महापालिकेच्या प्रभाग अधिकारी यांनी अहवाल अपर तहसीलदार कार्यालयात सादर करता आला नाही असे पालिका सूत्रांनी सांगितले .
दरम्यान गुरुवारी श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल सह नरेंद्र उपरकर आदींच्या नेतृत्वाखाली काशीमीरा पोलीस ठाण्या मागील पालिकेच्या प्रभाग समिती ६ च्या कार्यालयात आदिवासींनी ठिय्या आंदोलन केले . यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे तसेच आदिवासींनी पालिकेच्या विरोधात घोषणा देत निषेध केला . मोठ्या संख्येने आदिवासी महिला पुरुष उपस्थित होते. तर विहित नमुन्यातील अर्जात असलेल्या त्रुटी आदिवासींनी पूर्ण केल्यावर तहसीलदार कार्यालयात अहवाल सादर करण्यात येईल. आदिवासींना देखील अर्जातील त्रुटी दूर करण्यास सांगितले आहे असे पालिका सूत्रांनी सांगितले.