- नितिन पंडीत
भिवंडी: भिवंडीतआगिंचे सत्र सुरूच असून मंगळवारी सात भंगार गोदामांना लागलेली आग विझते न विझते तोच आमने गावात असलेल्या गोदाम संकुलनातील दोन कंपन्यांना बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
तालुक्यातील आमने गावच्या हद्दीत असलेल्या महावीर गोदाम संकुलनात व्हीआरआयपीएल रिटेल कंपनी व ऑर्बीट एक्स्पोर्ट कंपनी या दोन गोदाम कंपन्यांना पहाटे भीषण आग लागली असल्याने लागलेल्या आगीत दोन्ही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. या गोदाम कंपन्यांमध्ये प्लास्टिक ,कासमैटीक , घरगुती साहित्य , हार्डवेअर तसेच कापडाचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आला होता.
बुधवारी पहाटेच्या सुमारास या दोन्ही गोदामांना भीषण आग लागल्याने दोन्ही गोदामे जळून खाक झाली आहेत. या आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी, कल्याण ,ठाणे येथील तीन गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान मार्च महिना आला की भिवंडीत गोदाम व यंत्रमाग तसेच डाइंग सायजिंग कंपन्यांना आग लागण्याचे सत्र सुरू होत असल्याने या आगिंमागील नेमकी कारण समजत नाही. त्यामुळे या आगी अचानक लागतात की इन्शुरन्स मिळविण्यासाठी लावल्या जातात याबाबतचे सत्य समोर येतांना दिसत नाही. त्यामुळे या आगिंच्या घटनांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.