ठाणे : चार उमेदवारांना मत देण्याचा मनात गोंधळ असताना मतदानासाठी मतदारांचा उत्साह मात्र दिसून आला. कपाळ््यावर आठ्या असल्या तरी रांगेत उभे राहून मतदान केले. यादीत नाव न आल्याने काहींना नाराज होऊन परतावे लागले. यंदा मतदानाला मुकल्याची खंत त्यांच्या मनात होती. सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा दिसल्या. एका मतदाराने तीन मशीनवर चार मते द्यायची असल्याने प्रत्येकाच्या मनात गोंधळ होता. रांगेत एकमेकांना प्रश्न विचारत होते. जेव्हा मतदानास सुरूवात झाली तेव्हा पहिल्या मतदाराला किमान चार ते पाच मिनिटे लागली. केंद्राध्यक्ष मात्र मतदारांचा गोंधळ दूर करण्यास शेवटपर्यंत प्रयत्न करीत होते. बाहेर असलेले पोलीसही मतदार केंद्र शोधून देण्यास मदत करीत होते. कोपरीतील आनंदनगर येथील मतदान केंद्रात अ, ब, क, ड प्रमाणे मशीन न लावता त्या उलट - सुलट लावल्या होत्या. उमेदवारांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी संबंधितांना कळवून मशीन अ, ब, क, ड प्रमाणे लावण्यास सांगितले. प्रभाग क्र. २० मधील ५५ क्रमांकाच्या मतदान केंद्रात मतदानयंत्रे सकाळच्या वेळेस अचानक बंद पडल्याने मतदारांची चीडचीड झाली. सकाळी आॅफीसला जाणाऱ्या मतदारांनी येथे रांग लावली होती. परंतु, अचानक मशीन बंद पडल्याने मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रातील संबंधीत कर्मचाऱ्यांनी मशीन सुरू होण्यास एक तास लागेल, असे सांगितल्यावर अनेक नोकरदार मत न देताच परतले. काही मतदारांचे यावेळी वादही झाले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. पारशीवाडी ठाणे महापालिका शाळा क्रमांक ३४ येथे आलेल्या मतदारांची मतदान केंद्र शोधण्यासाठी धावाधाव सुरू होती. पहिल्या मजल्यावर शौचालयाच्या बाजूला मतदान केंद्र असल्याने दुर्गंधीमुळे मतदारांना प्रचंड त्रास झाला. या उग्र वासाने पोलीसही त्रस्त झाले होते. सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या भास्कर कॉलनी येथील मतदार सर्वाधिक संख्येने बाहेर पडले. सकाळपासून किमान दहाजण तरी परतल्याची माहिती उपस्थितांनी दिली. (प्रतिनिधी)पोलिसांच्या खाण्यापिण्याची गैरसोयआदल्या दिवशीपासून मतदार केंद्राच्या ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या खाण्यापिण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांचे हाल झाले. आजूबाजूच्या लोकांकडे पाणी मागावे लागले. शासनाकडून कोणतीही व्यवस्था नव्हती. सकाळी ९ नंतर त्यांना नाश्ता आला. पोलीस कर्मचारी तहान - भूकेने व्याकूळ झाले होते. मतदानाचे क्षण केले कॅमेरात बंदिस्तमतदान केल्यानंतरचा क्षण कॅमेरात बंदिस्त करायला तरुण मतदार मात्र विसरले नाहीत. मतदार केंद्राच्या बाहेर पडल्या पडल्या अनेक जण फोटो काढीत होते आणि हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायला देखील विसरली नाहीत. दोन रुपयांचा फॉर्म मिळतोय, अशी उठली अफवाज्यांचे मतदार यादीत नाव नाही त्यांना मतदान केंद्र स्थळी दोन रुपयांचा फॉर्म भरुन मतदान करता येईल, अशी अफवा उठल्याने मतदानकेंद्रावर मतदारांनी एकच गर्दी केली होती. यावेळी महापालिकेला विचारले असता ही निव्वळ अफवा असून यात तथ्य नाही असे त्यांनी सांगितले. १ठाणे पूर्व येथील प्रभाग क्र मांक २० मधील मतदान केंद्रांवरील सुमारे १० ठिकाणी मशीन बदलण्यात आल्या होत्या. त्यामुळे मतदारांचा एकच गोंधळ उडाला. २आनंद भारती, युनायटेड शाळा, सिंधी हायस्कूल, या मतदान केंद्रांसह सुमारे १० मतदान केंद्रांच्या मशीन बदलण्यात आल्या आहेत. या मशीनमध्ये तांत्रिक बाबींमुळे बिघाड झाल्याने या मशीन बदलण्यात आल्या. ३या संदर्भांत प्रभाग क्र मांक २० चे निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांच्याशी संपर्क साधला असता, तांत्रिक अडचणींमुळे १० ठिकाणी मशीन बदलण्यात आल्या आहेत. तसेच या मशीन मधील डाटा सीलबंद राहणार आहे. या मशिनवरर झालेले मतदानदेखील सुरक्षित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
याद्यांचा गोंधळ तरीही मतदारांचा उत्साह मात्र कायम
By admin | Published: February 22, 2017 6:15 AM