ठाणे: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आगरी शाला ठाण्यात सुरू झाली आहे. यात पहिल्या दिवशी आलेल्या भाषाप्रेमींनी आगरी भाषेचे धडे गिरवले. यात आगरी भाषेतील बाराखडीपासून प्रत्येक शब्दांचा उच्चार कसा करावा याचे प्रशिक्षण या शालेतल्या प्रशिक्षणार्थींनी घेतले. केवळ ठाणे नव्हेच तर पुणे, अलिबाग, मुंबई, ठाणे, बाळकुम, भिवंडी अशा विविध भागांतील आगरी अन बिगर आगरी प्रशिक्षणार्थींचाही सहभाग होता. आगरात-मीठागरात काम करणारे आगरी आणि त्यांची बोलीभाषाही आगरी. परंतू काळानुरूप या भाषेचे विविध पैलू जसे की कमी शब्दात व्यक्त होणे, एकाच शब्दाचे अनेक अर्थ असणे, सहज समजणे नवी पिढीपासून लुप्त वा दूर चालले आहेत. आगरी भाषेचे विविध अंग कळावे त्यातील साहित्याची गोडी कळावी या अनुषंगाने युवा साहित्यिक सर्वेश तरे यांनी ‘आगरी शाला’ हा बोली भाषा संवर्धनार्थ नविन प्रयोग सुरू केला. या आगरी शालेच्या पहिल्या वर्गाला पंधरा प्रशिक्षणार्थांनी सहभाग नोंदवला. यात आगरी अन बिगर आगरी प्रशिक्षणार्थींचाही सहभाग होता. या आगरी शालेच्या पहिल्या वर्गात गजानन पाटील, प्रकाश पाटील, मोरेश्वर पाटील आणि सर्वेश तरे यांनी मार्गदर्शन केले. प्रकाश पाटील यांनी आगरी लुप्त होत चालेलेल्या काही शब्दांची आठवण करून दिली. मोरेश्वर पाटील यांनी ही भाषा फक्त समाजापुर्ती मर्यादित नसून तीची व्याप्ती विशाल आणि सर्व समावेशक आहे हे समजवून दिले. गजानन पाटील यांनी आगरी बोलीचा व्यवहारात कसा वापर करता येऊ शकतो हे समजवून सांगीतले. सर्वेश तरे यांनी आगरी बोली जर एका दिवसात शिकायची झाल्या सोप्पे नियम सांगत ‘ळ’ या अक्षरा ऐवजी ‘ल’ , ‘ण’ या अक्षरा ऐवजी ‘न’ , ‘ड’ या अक्षरा ऐवजी ‘र’ असा शब्द प्रयोग करण्याचा प्रयत्न केला की आगरी भाषा तुम्हाला सहज बोलता येऊ शकेल असे सांगीतले. या शाळेचे पुढील वर्ग शनिवार-रविवार भरणार असून एकाच दिवशी दोन सत्रांचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. पुढील ‘आगरी शालेचे वर्ग’ ५-६ मे, १२-१३ मे तसेच १९-२० मे रोजी कशेळी येथील शाळेत ४ ते ६ या वेळेत भरणार आहे. या वर्गासाठी प्रा. सदानंद पाटील, प्रा. एल.बी पाटील, डॉ. अनिल रत्नाकर, दया नाईक, प्रकाश पाटील, मोरेश्वर पाटील, गजानन पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या आगरी शालेत अजूनही कुणाला सहभाग घ्यायचा असेल तर ९०९६७२०९९९ यावर संपर्क साधण्याचे कवी सर्वेश तरे यांनी आवाहन केले असून हे प्रशिक्षण शिबीर मोफत असणार आहे.-------------------------------------------फोटो : आगरी बोली
ठाण्यात भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन सुरू झाली आगरी शाला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 3:59 PM
उन्हाळ््याच्या सुट्टीत भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात आगरी बोली भाषा शिकविणारी आगरी शाला सुरू झाली आहे. ही भाषा शिकण्यासाठी दहा दिवसांच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्ग घेतले जात आहे.
ठळक मुद्देसुरू झाली आगरी बोली भाषा शिकविणारी आगरी शाला भाषाप्रेमींनी गिरवले आगरी भाषेचे धडे आगरी अन बिगर आगरी प्रशिक्षणार्थींचाही सहभाग