लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्ह्यातील उद्योजकांना एकत्र करून एक लाख रोजगारांचे एमओयू करून नाेकऱ्या मिळवून देण्यात येतील, असे आश्वासन कौशल्य विकास व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. यावेळी त्यांनी शहरात फिरते कौशल्य केंद्र सुरू करण्याची घाेषणा केली. त्यामार्फत ५०० हून जास्त अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिकवले जातील, तसेच चाळी, झोपडपट्टीतही हे फिरते केंद्र जाईल, असेही ते म्हणाले.
कोपरी-पाचपाखाडी येथे ‘शासन आपल्या दारी’मध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे, बारटक्के फाउंडेशन व जगदाळे फाउंडेशन आयोजित पं. दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा रविवारी आर. जे. ठाकूर कॉलेज येथे पार पडला.
यावेळी माजी नगरसेवक हणमंत जगदाळे, दिलीप बारटक्के, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे दिगंबर दळवी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त संध्या साळुंखे, सी. डी. देशमुख प्रशिक्षण संस्थेचे संचालक महादेव जगताप, मंगेश ठाकूर, वनिता गोगरे, दिगंबर ठाकूर आदी उपस्थित होते.
६० कंपन्या सहभागी
रोजगार मेळाव्यात १८ ते ४५ वयोगटातील तीन हजार १०० उमेदवारांनी नोंदणी केली हाेती. ठाणे, मुंबई, पुणे या जिल्ह्यातील ६० कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या. एक हजार २२१ महिला उमेदवारांंचा समावेश आहे. यातील ७४३ जणांची प्राथमिक निवड झाली असून, ३५ जणांची अंतिम निवड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.