भिवंडी : तालुक्यात स्थानिक भूमिपुत्र समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आगरी समाजाच्या आगरी महोत्सवाचे आयोजन दिनांक २५ ते ३० जानेवारी दरम्यान सोनाळे येथील ग्रामपंचायत क्रीडांगणावर करण्यात आल्याची माहिती आयोजन समितीचे प्रमुख संस्थापक विशु भाऊ म्हात्रे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे .या प्रसंगी महोत्सव समितीचे अध्यक्ष दयानंद चोरघे,पदाधिकारी यशवंत सोरे,संतोष पाटील,रमेश कराळे,सुनील पाटील,रवींद्र तरे,सौ नंदिनी भोईर,मनोहर तरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मागील अकरा वर्षांपासून या आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून यंदा या महोत्सवात आगरी समाजा सोबत सर्व समाजाला सोबत घेऊन हा सोहळा साजरा केला जाणार आहे अशी माहिती आयोजन समितीचे पदाधिकारी यशवंत सोरे यांनी दिली. या महोत्सवात आगरी रूढी परंपरा, पारंपरिक शेतीचे प्रदर्शन, दुर्गाडी किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
या महोत्सवाची सुरवात गुरुवारी वारकरी महोत्सव दिंडी भजन कीर्तन कार्यक्रम भगवंताच्या नामस्मरणाने साजरा केला जाणार आहे.या नंतर वसंत हंकारे यांचे युवतींसाठी प्रबोधनपर व्याख्यान आयोजन केले आहे.तर स्थानिक कलावंतांच्या सांस्कृतिक कार्यक्रम, आगरी पद्धतीचे खानपान स्टॉल यांची रेलचेल या ठिकाणी असणार आहे.तर सर्व समाजातील गुणवंतांचा सन्मान या कार्यक्रमा दरम्यान केला जाणार आहे अशी माहिती यशवंत सोरे यांनी दिली आहे.