ठाणे : सध्या महागाईचा आगडोंब उसळला असताना ही शेतमालाला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तरूण बेरोजगार आहेत, तर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यावर तोडगा काढण्याऐवजी सरकार भावनिक खेळ खेळत असल्याचा आरोप करीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार निदर्शने केली.
येथील शासकीय विश्रामगृहाजवळ या कार्यकर्त्यांनी आज महागाई व बेरोजगारी विरोधात निदर्शने करून प्रशासनाचे लक्ष वेधले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यार्नी ही निदर्शन केली. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. एखाद्या राज्यात निवडणुका आल्यास इंधनाच्या दरात दोन रूपये कपात करून नंतर पाच रूपये वाढविले जात आहेत. दोन कोटी रोजगाराचे आश्वासन देऊनही तरूणांच्या हाताला रोजगार देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही या आंदोलनकर्त्यांनी आज करून त्याच्या निषेधार्थ आंदोलन छेडले. यावेळी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, महिलाध्यक्षा सुजाता घाग, महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आदी पदाधिकारी व कर्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळेस कार्यकर्त्याकडून केंद्र आणि राज्य सरकारचा धिक्कार करीत बस हुई महँगाई की मार, नहीं चाहिये मोदी सरकार; सरकार करतंय अंगणवाडी सेविकांचा छळ,यावेळी नाही मिळणार राज्य-केंद्र सरकारला बळ; उच्च शिक्षण घेऊन पकोडे तळायचे ? यावेळी जुमलेबाजांना खाली खेचायचे; बळीराजा घेतोय फाशी, सरकार खातंय तुपाशी; पेट्रोल-डिझेल झाले शंभरीपार, सरकारला करू या कायमचे हद्दपार" असे घोषणाचे फलक कार्यकर्त्यांनी हातात हे आंदोलन आज छेडले.