भातसानगर : सतत पडणाऱ्या पावसामुळे आठ दिवसापासून पाण्याखाली गेलेली भातपिके कुजून गेल्याने शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने ते हवालदिल झाले आहेत.
पावसामुळे सर्व ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने त्यांच्या क्षेत्राखाली येणारी शेत आठ दिवस पाण्याखाली आल्याने लागवडीखाली आलेली सर्व भातपिके शेतातच कुजून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सुरूवातीला काही दिवस पाऊस पडल्याने शेतकºयांनी बियाण्यांची पेरणी केली. मात्र पाऊस गेल्याने पेरलेले भात बियाणे पक्ष्यांनी खाल्यामुळे भात रोपे तुरळक आल्याने शेतीसाठी आवश्यक रोपे कमी पडल्याने बरीच शेती ओसाड राहिली. त्यात भर पडली ती अतिवृष्टीची. आज शेतकरी ना पेरणी करू शकत ना आवण आणू शकतो. त्यामुळे मागीलवर्षीपेक्षा यावर्षी ओल्या दुष्काळाची परिस्थिती आताच ओढावली आहे. पावसामुळे शेताचे बांध फुटल्याने शेतातील वर्षभराचे साठवलेले शेणखत वाहून गेले. तर वरच्या शेतातील गाळ खालच्या शेतात वाहून आला आहे.