ठाणे: अहमदनगर जिल्हयातील केडगाव उपनगरात दोन शिवसैनिकांच्या हत्येनंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी भाजपाचे आमदार शिवाजी कर्डीले यांना अटक केली असून दोन्ही प्रकरणातील आरोपी कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही. याठिकाणी पोलिसांवर दबावाचा नव्हे तर गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर असला तरी आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमानंतर स्पष्ट केले.ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयातील वितक्क कोकण परिक्षेत्रीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन माथूर यांच्या हस्ते झाले. यावेळी कोकण परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधीक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रात राबविलेल्या नविन संकल्पनांची सादरीकरणाद्वारे महासंचालकांना माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करतांना माथूर यांनी हा इशारा दिला. ते पुढे म्हणाले, अहमदनगरची घटना ही दुर्दैवी आहे. केडगाव उपनगरात संजय कोतकर आणि वसंत ठुबे या शिवसैनिकांच्या हत्येनंतर पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांना ताब्यात घेतले होते. त्याचवेळी दोन हजारांच्या जमावाने अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केली. तोडफोड प्रकरणातही आमदार कर्डिले यांना अटक झाली असून पोलीस कोठडीही मिळाली आहे. त्यामुळे पोलीसांवर कोणाचाही याठिकाणी दबाव असण्याचा प्रश्न नाही. तर गुन्हेगारीचा प्रश्न आहे. दोन्ही प्रकरणात कोणालाही दया दाखविली जाणार नाही. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, वार्तालापापूर्वी पोलिसांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, एकीकडे डिझीटलायझेशन होत असतांना माणूसकी मात्र लोप पावत असल्याचा टोेला त्यांनी आपल्या पोलिसांसह जनतेला लगावला. तर नागरिकांध्येही पती पत्नीच्याही संवादामध्ये मर्यादा आल्या असून सोशल मिडीयाचे महत्व वाढत चालले आहे. अशावेळी पोलिसांनीही डिझीटलायझेशनबरोबर जनतेशी थेट संपर्क वाढविण्यावरही अधिक भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला. पूर्वी फोनसारखी संपर्काची माध्यमे अगदी मर्यादीत असतांनाही जनतेकडून पोलिसांना थेट माहिती मिळत होती. आता तसे होताना दिसत नाही. यासाठी किमान रोज एका नागरिकाची विचारपूस करा, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक त्या त्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात लावा. पोलीस कोठडीसमोर सीसीटीव्ही असावेत. महिला आणि मुलांच्या अपहरण प्रकरणांचा प्राधान्य आणि परिणामकारकपणे तपास होणे अपेक्षित आहे. आर्थिक गुन्हयांच्या बाबतीतही बँक खाती सील करतांना अधिक काळजी घेतली पाहिजे. याशिवाय, पासपोर्ट देतांना सीसीटीएनएसद्वारे अन्य पोलीस ठाण्यांमध्ये संबंधितांवर गुन्हे दाखल नसल्याची खबरदारी घ्या. पुणे आणि औरंगाबादप्रमाणे पोलीस स्कूलचीही चांगल्याप्रकारे निर्मिती झाली पाहिजे. पोलीस शिपायाच्या मुलाने पुन्हा शिपाई होण्यापेक्षा उच्च पदस्थ नोकरी मिळविण्याइतपत शिक्षण घेतले पाहिजे. नाशिकच्या धर्तीवर ई बुकलेट करावे. अशा अनेक सुचना माथूर यांनी आपल्या अधिकाºयांना केल्या. अधिवेशनात पोलिसांची बाजू चांगल्या प्रकारे माडण्यासाठी तारांकित प्रश्नांची चांगल्या रितीने उत्तने दिली गेली पाहिजेत.यावेळी ठाण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, सिंधुदूर्गचे पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, रायगडचे अनिल पारसकर आणि रत्नागिरीचे अधीक्षक अशोक प्रणय यांनी आपआपल्या जिल्हयात राबविलेल्या विशेष उपक्रमांची सादरीकरणाद्वारे महासंचालकांना माहिती दिली.