ठाणे : दीड महिन्यापूर्वी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लघू उद्योजकांचा ऑक्सिजनपुरवठा राज्य शासनाने थांबविला होता. त्यामुळे ज्या उद्योगांना ऑक्सिजनची गरज लागते, असे उद्योग बंद पडले होते, परंतु आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने, उद्योगांना ऑक्सिजनचा ३० टक्क्यांपर्यंत पुरवठा पुन्हा सुरू करावा, अशी मागणीचे निवेदन ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे आणि विकास आयुक्त हर्षदीप कांबळे यांना दिले आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढल्याने ७ एप्रिल रोजी राज्य शासनाने उद्योगांचा १०० टक्के ऑक्सिजनपुरवठा थांबवून, तो रुग्ण / हॉस्पिटलसाठी राखीव ठेवला होता. औद्योगिक वापरासाठी लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे बंद केल्याने, अत्यावश्यक सेवेखाली चालू असणारे उद्योगही ऑक्सिजनअभावी बंद आहेत, परंतु आता सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, हॉस्पिटल्समधील रुग्णांची ऑक्सिजनची गरजही कमी झाली आहे, तसेच ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. त्यामुळेही ऑक्सिजन पुरेसा असल्याचे दिसत आहे, तसेच मोठ्या प्रमाणात क्रायोजनिक ऑक्सिजन टँक वापरले जात आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे निदान २० ते ३० टक्के ऑक्सिजनपुरवठा उद्योगासाठी देण्यात यावा, जेणेकरून ऑक्सिजनअभावी जे उद्योग पूर्णपणे बंद आहेत, त्यांना संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा या निवेदनात व्यक्त केली आहे. अनेक ऑक्सिजन प्लान्टमधून त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी ऑक्सिजन हॉस्पिटल्सकडून नेला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा ऑक्सिजन प्लान्टचा उरलेला अतिरिक्त ऑक्सिजन उद्योगांना देण्याची मुभा द्यावी, हा ऑक्सिजन हॉस्पिटलतर्फे उचलण्यात येत नसल्याने व प्लान्टमध्ये स्टोरेज सुविधा नसल्याने तो वाया जाऊन प्लान्टचेही नुकसान होते. ही बाब अन्न व औषध प्रशासनासही माहिती असून, त्यामुळे तो औद्योगिक वापरासाठी उपलब्ध करून दिल्यास उद्योगांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.