ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाद्वारे दिपावली पूर्व व दिपावली कालावधीत (लक्ष्मीपूजन) ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. २४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेतील धुलीकणांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 245 µg/m³ इतके आढळले. तसेच यादिवशी हवेतील NOx (ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन)चे प्रमाण 56 µg/m³ तर SO2चे (सल्फर डाय ऑक्साईड) प्रमाण 29 µg/m³ इतके होते. त्यानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक १९७ इतका होता. दिपावली पूर्व कालावधीत २१ ऑक्टोबर रोजी हवेतील धुलिकणांचे प्रमाण 152 µg/m³, हवेतील NOx चे प्रमाण 48 µg/m³ तर SO2 चे प्रमाण 25 µg/m³ इतके आढळले होते. त्यानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक १३५ इतका होता.
या वर्षी नागरिकांद्वारे दिवाळी सण उर्त्स्फुतपणे साजरा करण्यात आला असून, याकाळात फटाके वाजण्याच्या प्रमाणात देखील वाढ झालेली निदर्शनास आली. सन २०२१च्या दिवाळी कालावधीतील हवेच्या गुणवत्तेशी तुलना केली असता सन २०२२ मध्ये दिवाळी कालावधीत हवेतील प्रदूषणाच्या पातळीत ४ टक्के तर ध्वनी पातळीत २४ टक्के वाढ झाल्याचे दिसते. मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, उप पर्यावरण अधिकारी विद्या सावंत आणि ज्युनियर केमिस्ट निर्मिती साळगावकर यांच्या टीमने हवेच्या गुणवत्तेचा आणि ध्वनी प्रदूषणाचा अभ्यास केला. हरित फटाक्यांचे प्रमाण वाढले असल्याचे निरीक्षण प्रधान यांनी नोंदविले. त्या म्हणाल्या की, नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले. त्यात हरित फटाक्यांचा वापरही वाढल्याचे लक्षात आले. या वर्षीच्या अभ्यासात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ध्वनी आणि वायू या दोन्हीत वाढ नोंदली गेली. त्याला काही प्रमाणात कमी झालेले तापमानही कारणीभूत ठरले. जड हवेमुळे प्रदूषणात वाढ होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"