अजित मांडके ठाणे : वाहनांची वाढती संख्या, उद्योगांकडून सोडण्यात येणारे विषारी वायू, नव्याने होणारी बांधकामे यामुळे ठाण्यातील प्रमुख सर्वच चौकांच्या परिसरात विषारी वायूंचे आणि धुलीकणांचे प्रमाण कमालीचे वाढलेले आहे. तीनहातनाका परिसर आणि दिवा येथे तर हवेची पातळी घातक असल्याचे आढळले आहे. मुदलात ठाणे हे हवा, ध्वनी, जलप्रदूषणात आघाडीवर असल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या पर्यावरण अहवालात काढण्यात आला आहे.ठाणे महापालिका हद्दीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाहनांच्या संख्येत एक लाख पाच हजार ५३४ एवढी वाढ झाली. त्यातही शहरातील दुचाकींची संख्या ही १० लाख ७६ हजार ५६४ एवढी झाली आहे. शहरात आजघडीला एकूण १९ लाख २७ हजार १५५ वाहने असल्याचे पर्यावरण अहवालात नमूद केले आहे. महापालिकेने शहरातील १६ चौकांचे सर्वेक्षण केले असता, त्याठिकाणी हवेतील धुलीकणांचे प्रमाण हे मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले आहे. कळवानाका, मल्हार सिनेमा, सॅटीसवर आणि खाली, तीनहातनाका, कोपरी, मुलुंड चेकनाका, आनंद सिनेमा गेट, कोर्टनाका आणि एम.एच. हायस्कूल आदींसह १९ चौकांत कार्बन मोनॉक्साइड आणि बेन्झिनचे प्रमाण हे मर्यादेपेक्षा अधिक आढळून आले. शहरातील निवासी परिसर असलेल्या कोपरी प्रभाग कार्यालय, व्यावसायिक परिसर असलेल्या शाहू मार्केट आणि औद्योगिक परिसरातील रेप्टाकॉस ब्रेट अॅण्ड कंपनी अशा तीन ठिकाणी धुलीकणांचे प्रमाण अधिक असून मुख्य १६ चौकांत धुलीकणांचे प्रमाण हे मानकापेक्षा जास्त आढळले आहे.तीनहातनाका येथे २४ तासांच्या सर्वेक्षणात नायट्रोजन आॅक्साइड व धुलीकणांचे प्रमाण हे यंदा घातक पातळी ओलांडून पुढे गेले आहे. ठाणे कळवा जोडपुलाजवळील बाळकुम, साकेत, शिवाजी चौक आणि सिडको रोड आदी ठिकाणीदेखील धुलीकणांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. दिव्याच्या डम्पिंगवरदेखील धुलीकणांचे प्रमाण कमालीचे वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु, पालिका अद्यापही या डम्पिंगबाबत ठोस पावले उचलताना दिसत नाही. गणेशोत्सव आणि दिवाळीच्या काळात ध्वनिप्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले असले, तरी हवेच्या प्रदूषणात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, धुलीकणांचे प्रमाण मानकांपेक्षा दोनपटीने अधिक वाढल्याचे दिसून आले आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेतील धुलीकणांचे प्रमाण २६४ इतके आढळून आले आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत शहरातील निवासी, व्यावसायिक, शांतता क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र असे मिळून ४० स्थळांचे सर्वेक्षण केले असता, त्यातील ३१ स्थळांच्या ठिकाणी ध्वनीची पातळी ही ७५ डेसिबलपेक्षा अधिक आढळली. दिवसाच्या आणि रात्रीच्या ध्वनिप्रदूषणातही वाढ झाल्याचे आढळले आहे. विटावा चौक, मुकंद कंपनी, मुंब्रा वॉर्ड आॅफिस, मुंब्रा फायर स्टेशन, वाघबीळ नाका, हॉटेल फाउंटन (शीळफाटा), ठाणा कॉलेज, मासुंदा तलाव, हरिनिवास सर्कल, जांभळीनाका, नितीन सिग्नल, वर्तकनगर अशा काही भागांचा यात समावेश आहे. शहरातील १२ शातंता क्षेत्रांतही ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढल्याचा निष्कर्ष अहवालात नमूद केला असून पाच ठिकाणी ध्वनीची पातळी ७५ डेसिबलपेक्षा जास्त आढळली आहे.>साठवणुकीच्या पाण्याची गुणवत्ता मानकापेक्षा कमी प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत पिण्याच्या पाण्याचीही गुणवत्ता तपासण्यात आली. त्यानुसार, ३० हजार ३३२ ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्यात १२ हजार ३१८ नमुन्यांपैकी ११ हजार २०१ नमुने पिण्यायोग्य आढळले, तर १११७ नमुने पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.वितरण व्यवस्थेतील पाण्याची गुणवत्ता ९१ टक्के आढळली आहे. ती जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ)च्या मानकाच्या जवळपास आहे. टाक्यांमधील साठवणुकीच्या पाण्याचे १८ हजार १४ नमुने घेतले गेले. त्यातील १२ हजार ७८१ नमुने पिण्यायोग्य आढळले, तर ५ हजार २३३ नमुने अयोग्य आढळले आहेत.म्हणजे, साठवणुकीच्या पाण्याची गुणवत्ता ७१ टक्के आढळून आली आहे. सोसायटीच्या टाक्या नियमितपणे साफ न झाल्याने तसेच नागरिक बुस्टर पंप लावून पाणी खेचत असल्याने टँकरचे पाणी टाकत मिसळते. पाण्याचा दाब नलिकेत कमी झाल्याने नळाद्वारे बाहेरील सांडपाणी येते, त्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावली आहे.>खाडीही होतेय प्रदूषित... : प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत खाडीच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली असता खाडीजवळ झालेली अतिक्रमणे तसेच नाल्यामधून येणाºया घनकचºयामुळे पाण्याच्या प्रवाहाची गती कमी झाली आहे. तसेच खाडीत स्लगचे प्रमाण वाढत असून आॅरगॅनिक प्रदूषण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.>तलावही झाले प्रदूषिततलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी सर्वच तलावांमधील फॉस्फेट आणि नायट्रेटचे प्रमाण हे मर्यादेपेक्षा अधिक आढळून आले आहे. दिवा, गांधीनगर, जेल, कोलशेत, मखमली, शिवाजीनगर, सिद्धेश्वर व खर्डी तलावात रसायनांचे प्रमाण अधिक आढळले आहे.>खाडीत मुंबई, ठाणे महापालिका, सिडको, ठाणे, बेलापूर औद्योगिक क्षेत्र आणि एमआयडीसी परिसरातून येणारे सांडपाणी, कारखान्यांतील उत्सर्जित पाणी मिसळल्यामुळे ठाणे खाडीचे प्रदूषण वाढले आहे.