सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात सुरू असलेले भुयारी गटारीचे कामे, खड्डेमय रस्ते, वाहनांची संख्या, लहान-मोठें कारखाने आदीमुळे हवेतील गुणवत्ता मुंबई पेक्षा दुपटीने घसरली. याचा परिणाम मध्यवर्ती रुग्णालयात दमा, श्वास घेण्यास तत्रास आदी रुग्णांत वाढ झाल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली.
उल्हासनगरसह एमएमआरडीए क्षेत्रातील शहरातील हवेची गुणवत्ता घसरली आहे. शहरातील हवेची गुणवत्ता मुंबईसह इतर शहरा पेक्षा दुप्पटीने घसरल्याने उघड झाले. मुंबईची हवेतील गुणवत्ता १४९ एक्यूआर तर उल्हासनगरची २७९ एक्यूआर म्हणजे दुप्पट असल्याचे उघड झाले. हवेतील हे प्रदूषण आरोग्यासाठी घातक असल्याची माहिती हिराली फौंडेशनच्या अँड सरिता खानचंदानी यांनी दिली. याप्रकरणी उल्हासनगरसह इतर महापालिकेला नोटिसा पाठविल्याच्या त्या म्हणाल्या. शहरात ४१६ कोटीच्या निधीतून भुयारी गटारीचे काम सुरू असल्याने, नेताजी गार्डन, कॅम्प नं-४ येथील हिंदू स्मशानभूमी, कुर्ला कॅम्प रस्ता, शांतीनगर ते डॉल्फिन रस्ता विकास कामामुळे मातीने व धुळीने माखले आहे.
शहरात भुयारी गटार योजनेचे काम संथगतीने सुरू असून गटारीचे काम पूर्ण होताच रस्ता दुरुस्त केले जात नाही. त्यामुळे सर्वत्र माती व धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. शहरात प्रमाणा पेक्षा जास्त वाहनांची संख्या असून लहान-मोठे कारखाने सुरू आहेत. हवेतील गुणवत्ता २५० एक्यूआर असल्याने, ती आरोग्यासाठी धोकादायक पातळीवर पोहचली आहे. प्रदूषण मंडळाचे अनिरुद्ध वऱ्हाडे यांनीही हवेतील गुणवत्ता घसरल्याची माहिती दिली आहे.