- नारायण जाधव ठाणे : दीडशे वर्षांपूर्वीच्या ठाणेरेल्वेस्थानकाला पर्याय म्हणून ठाणे आणि मुलुंडदरम्यान उभारण्यात येणाऱ्या नवीन उपनगरीय रेल्वेस्थानकाच्या बांधकामापूर्वी आवश्यक असलेल्या त्याच्या परिचलन क्षेत्रासह नियोजनाचे आराखडे तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार शोधण्याच्या हालचाली ठाणे महापालिकेने सुरू केल्या आहेत. यासाठीची निविदा प्रकिया प्रशासनाने सुरू केली असून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपूर्वी नव्या स्थानकाचे भूमिपूजन करण्याचा मनोदय सत्ताधारी शिवसेनेचा आहे.सध्याच्या ठाणे स्थानकाची अवस्था अतिशय बिकट झाली असून प्रवासीसंख्या वाढली, तरी जागेअभावी त्याचा विस्तार करता येत नाही. यामुळे ठाणे शहर आणि परिसराच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने नवीन रेल्वेस्थानक होणे ही काळाची गरज आहे. यासाठी ठाणे आणि मुलुंडदरम्यान नवीन उपनगरीय स्थानक बांधण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत घेतला. त्यासाठी सर्व्हेही केला. या सर्व्हेनुसार नवीन स्थानक झाल्यास ठाणे स्थानकाचा ३१ टक्के व मुलुंड स्थानकाचा २४ टक्के असा एकूण ५५ टक्के भार कमी होणार असल्याचे दिसून आले. रेल्वेमार्गालगत असणाºया मनोरुग्णालयाच्या १४.१३ एकर जागेवर ते बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत २८९ कोटी रुपयांची मंजुरीही मिळवली. रेल्वे महाव्यवस्थापक व रेल्वेमंत्र्यांची गेल्या वर्षी त्याला तांत्रिक मंजुरीदेखील घेतली आहे. मनोरुग्णालयाच्या ४.७० एकर जागेवरील अतिक्र मण झालेल्या २०० च्यावर झोपड्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी महापालिकेने उचलली आहे. हे सोपस्कार पार पाडल्यानंतर त्याच्या बांधणीसाठी आवश्यक असलेल्या परिचलन आणि नियोजनाचे आराखडे तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराचा शोध सुरू केला आहे.असे असणार आहे नवे स्थानकरेल्वेस्टेशन, नाल्यावरील पूल, रेल्वे ट्रॅक, एफओबी, फलाट व सिग्नलचे काम तसेच आजूबाजूच्या परिसराचे कामदेखील या माध्यमातून केले जाणार असून यामध्ये पार्किंग, इन्व्हर्टर डेक, कम्पाउंड वॉल ही कामे केली जाणार आहेत. ठाण्यातील स्टेशन परिसरातील सॅटीसप्रमाणे या ठिकाणीसुद्धा तीन रस्ते जोडणारा रस्ता तयार केला जाणार आहे.आनंदनगर चेकनाका, साठेवाडीतून डीपी रस्ता व मुलुंड चेकनाका रस्ता या तीन रस्त्यांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. हे सर्व रस्ते २४ मीटरचे असणार आहेत. भविष्यात ठाणे मेट्रोला हे नवे स्टेशन जोडले जाणार आहे. या नवीन स्टेशनशेजारी मेट्रोचे स्थानक असणार आहे.ठाण्यापासून सव्वा किलोमीटर, तर मुलुंडपासून सव्वा किलोमीटर असे अंतर असून मुलुंड आणि ठाण्याच्या मध्यभागी हे नवीन स्टेशन असणार आहे. ठाणे स्टेशनवरून रोज साडेसात लाख प्रवासी प्रवास करतात. त्यातील अडीच लाख प्रवाशांना हे नवे स्थानक सोयी ठरणार आहे.
नव्या ठाणे स्थानकासाठी हवा तज्ज्ञ सल्लागार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 1:03 AM