मुरलीधर भवार डोंबिवली : चाला आणि महात्मा गांधी यांच्यासारखे फीट रहा हा संदेश देण्याकरिता डोंबिवलीतील गांधीवादी प्रा. के. शिवा अय्यर हे रविवारी डोंबिवली ते दांडी अशा ‘दांडी यात्रे’ला प्रारंभ करणार आहेत. चालण्यामुळे माणूस निरोगी राहतो या गांधी विचारांबरोबरच गांधीजींच्या सत्य, अहिंसा, सत्याग्रह आदी तत्त्वांची देशाला आज तितकीच गरज आहे हा संदेश ते या यात्रेद्वारे देणार आहेत.रविवारपासून सुरु होणाºया दांडी यात्रेत प्रा. अय्यर यांच्यासोबत रवी पांडे व प्रा. ओमप्रकाश सुखमलानी सोबत करणार आहे. डोंबिवली ते मुंबई आॅगस्ट क्रांती मैदान हे अंतर चालताना जयभारत व साऊथ इंडियन शाळेचे ३४ विद्यार्थी सोबत असतील. डोंबिवली ते मुंबई हे अंतर तीन दिवसांत कापणात येईल. विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी सोबत रुग्णवाहिका व पोलिस बंदोबस्त घेण्यात आला आहे. आॅगस्ट क्रांती मैदान ते दांडी हा प्रवास अय्यर यांच्यासोबत केवळ दोघेच करणार आहेत. ३७५ किलोमीटरचे अंतर १२ दिवसांत कापून २ नोव्हेंबर रोजी अय्यर दांडीला पोहचणार आहेत. अंधेरी, नवघर, मनोर,दापचारी, भिलाड, वलसाड, सोनवाडी, नवसारी रोड आणि दांडा असा त्यांचा प्रवास राहणार आहे. वय वर्षे ५५ असलेल्या अय्यर यांच्या पत्नी ज्योत्स्ना या जयभारत शाळेत प्राचार्य आहेत. अय्यर यांच्या दांडी यात्रेत ज्योत्स्ना या देखील सहभागी होणार आहे.प्रा. अय्यर यांनी सांगितले की, भारत छोडो आंदोलनास ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. चंपारण्याच्या सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर दांडी यात्रेला ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. या आंदोलनांचे औचित्य साधून ही दांडी यात्रा आहे.
अय्यर यांची आजपासून डोंबिवली ते दांडी यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 3:53 AM