ठाणे : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांना बढती मिळाली असून त्यांची परभणी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.
प्रशासकीय कामाचा परिपूर्ण अभ्यास आणि अनुभव असल्याने अल्प कालावधीतच येथील जि.प.च्या अनेक धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णयात त्यांनी उत्तम भूमिका बजावली. मागील अनेक वर्षांपासून रखडलेली अनुकंपा भरती प्रक्रिया त्यांनी मार्गी लावून १३ अनुकंपाधारकांना सेवेत सामावून घेतले. त्याचबरोबर कोरोना काळात जिल्हा परिषदेच्या काही कर्मचाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला असता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळणारी ५० लाखांची मदत त्यांनी जलदगतीने मिळवून दिली. सशस्त्र ध्वजनिधी संकलनातही पुढाकर घेऊन शालेय विद्यार्थ्यांकडून निधी संकलनाची पूर्वपारंपरिक पद्धत बदलून अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्याने उद्दिष्ट १०० टक्के साध्य केले. कर्मचाऱ्यांचा नियतकालिक बदल्या, नियमित पदोन्नत्या आणि कर्मचाऱ्यांना सेवाकार्य काळाप्रमाणे मिळणारे आश्वासित प्रगती, कालबद्ध पदोन्नतीचे आर्थिक लाभही त्यांच्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांना मिळाले. काही संवर्गांचे तांत्रिक प्रश्न दूर करून सेवाविषयक अडचणी सोडविल्या आहेत.