ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तूर्तास आपल्या राजकीय निर्णयाला ब्रेक लावला असला तरी ते नाराज असून, त्यांच्या आजच्या बोलण्यातून ते स्पष्ट दिसून आल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. वज्रमुठीत त्यांची गळचेपी होत असून, ते लवकरच आपला निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांचे आम्ही स्वागत करू आणि त्यांना मानाचे पान दिले जाईल, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.
ठाण्यातील एका पत्रकार परिषदेत म्हस्के बोलत होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत ज्या पक्षाचे १५ आमदार आहेत, त्यांच्यासाठी वेगळी खुर्ची दिली जाते आणि सभा सुरू झाल्यानंतर त्यांची एण्ट्री होते, ज्यांचे ५६ आमदार आहेत त्यांना मात्र मान दिला जात नाही, अशी टीका म्हस्के यांनी केली. त्यामुळेच नागपूर येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी भाषण केले नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी शिवसेना, भाजप युतीला पाठिंबा दिला तर त्यांचे आम्ही स्वागत करू आणि मानाचे पान त्यांना देऊ, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी ‘मातोश्री’वर येणार यावरून म्हस्के यांनी नाराजी व्यक्त करीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. बाळासाहेबांची शिवसेना संपविण्यात ज्यांचा मोठा वाटा होता, जे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर कशाही पद्धतीने टीका करतात, त्यांचे पाय ‘मातोश्री’ला लागणे हे कदापि न पटण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु राहुल यांनी आपला पीए पाठविला आणि उद्धव यांनी दिल्लीला यावे तिकडेच सोनिया आणि राहुल गांधी आपल्याला भेटतील, असे सांगितले. त्यामुळे आता उद्धव व आदित्य दिल्लीला जाऊन मुजरा करणार का, असा सवालही म्हस्के यांनी केला.
ठाकरी बाण्याचे कायकाही दिवसांपूर्वी सिल्व्हर ओकला गेले आता दिल्लीला जात आहेत, तुमच्यातील ठाकरी बाणा गेला कुठे, असा सवाल उपस्थित करीत आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे बिलकुल आवडले नसते. ते होते तेव्हा शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गजांनी मातोश्रीवर हजेरी लावली होती. ती हिंमत गेली कुठे, असा सवाल म्हस्के यांनी केला.