विजय शिवतारेंच्या भूमिकेवर एकनाथ शिंदे मूकदर्शक बनले; अजित पवार गटाचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 05:06 PM2024-03-13T17:06:52+5:302024-03-13T17:09:30+5:30
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत थेट शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे.
Ajit Pawar Vs Vijay Shivtare ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सुनेत्रा पवार यांनी तयारी सुरू केली असून मागील काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्याकडून मतदारसंघ पिंजून काढला जात आहे. मात्र शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनीही नुकतीच लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करत अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत थेट शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे. विजय शिवतारेंच्या भूमिकेवर एकनाथ शिंदे मूकदर्शक बनले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.
विजय शिवतारे आणि एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करताना आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे की, "मागील दोन दिवसांपासून शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा अपमान करतायत, पक्षाच्या शक्तिस्थळांवर आघात करत आहेत. बारामती लोकसभेची जागा अपक्ष लढणार अशी घोषणा शिवतारेंनी केलीय. शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावान असल्याचा दावा करतात. यासाठी त्यांच्या या भूमिकेवर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी खुलासा करावा," अशी मागणी परांजपे यांनी केली आहे.
"शिवतारे यांच्या भूमिकेवर एकनाथ शिंदे मूकदर्शक बनले आहेत. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपाने अत्यंत संयम आणि मर्यादा बाळगली आहे. त्यामुळे याबाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी," असंही आनंद परांजपे म्हणाले.
शिवतारेंच्या भूमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खुलासा करावा - आनंद परांजपे
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) March 13, 2024
मागील दोन दिवसांपासून शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा अपमान करतायत, पक्षाच्या शक्तिस्थळांवर आघात करत आहेत. बारामती लोकसभेची जागा अपक्ष लढणार अशी घोषणा शिवतारेंनी… pic.twitter.com/T4AUr9pfWe
दरम्यान, नमो विचार मंच या माध्यमातून शिवतारे निवडणुकीत अपक्ष उभे राहणार आहेत. अजित पवार यांना आव्हान देताना विजय शिवतारे म्हणाले की, "बारामती लोकसभा मतदारसंघावर कुणाचा सातबारा नाही. यावर मालकी कुणाची नाही. त्यामुळे पवार पवार करण्याऐवजी आपला स्वाभिमान जागरूक करून लढलेच पाहिजे असा ठराव कार्यकर्त्यांनी केली. अजित पवारांनी २०१९ च्या निवडणुकीत खालची पातळी गाठली. मी लीलावती रुग्णालयात दाखल होतो. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी खोटं नाटक करतोय, तू कसा निवडून येतो हे बघतोच असं अजित पवार म्हणाले होते. राजकारणात उर्मट भाषा त्यांनी केली होती. मी त्यांना माफ केले, महायुतीत आल्यावर स्वागत केले. परंतु उर्मट भाषा गेली नाही," असं शिवतारे यांनी म्हटलं आहे.