अजित मांडके, ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आणि त्यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्रमक टीका केली जात आहे. या टीकेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टोकदार शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. "भाषण करायला माहिती लागते, अभ्यास करावा लागतो, त्याची मांडणी लागते. तुम्ही विरोधी बाकांवर येऊन भाषण करायचा आणि तुमचा पीए तुम्हाला भाषण लिहून देत होता. त्यातही सत्ताधारी पक्षावर केलेली टीका तुम्ही बाजूला काढून टाकत होता. एकूणच सत्ताधाऱ्यांचा विरोधी पक्षनेता, सत्ताधाऱ्यांच्या टिपांवर चालणारे अजित पवार होते," असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी ही टीका केली. "विरोधी बाकांवर असताना अजित पवार यांनी सत्ताधारी अडचणीत येणार नाही, याची व्यूहरचना नेहमी करत केली. मी एकदा सिडकोचे प्रकरण काढले होते, तेव्हा संपूर्ण सत्ताधारी अडचणीत येणार होते. परंतु तेव्हा अजित पवार यांनी चकार शब्दही काढला नाही. तुम्ही कशा कोणाकोणाच्या सुपाऱ्या वाजवायचे हे आम्हाला माहीत आहे," असा गौप्यस्फोटही आव्हाड केला. आम्ही त्या सुपारीत सहभागी झालो नाही, म्हणून आज ताठ मानेने बोलत आहोत असेही ते म्हणाले.
"अजित पवार सांगतील तसेच शरद पवार करीत होते, हीच मोठी चूक शरद पवार यांची झाली. वरिष्ठांच्या घरी जन्माला आलो असतो तर अध्यक्ष झालो असतो असे अजित पवार म्हणाले, मात्र तुम्हाला कोणी रोखले होते, असा सवाल उपस्थित करीत तुम्ही कोणत्या आंदोलनात, कोणत्या कार्यक्रमात सहभागी झालात, आपण सत्तेसाठी जन्माला आला आहात, आपल्या डोक्यात कायम हेच खुळ होते, रस्त्यावर आंदोलन केले का? ते आधी सांगावे," असे थेट आव्हानही आव्हाड यांनी दिले. "तुमच्या अंगावर साधी पोलीस केस आहे का? तुम्ही फक्त सत्तेचं राजकारण नेहमी करत राहिलात, तेही शरद पवारांचे नाव वापरून. तुम्ही रक्ताततच होता, म्हणून तुम्ही आमदार झाला, मंत्री झालात, त्यानंतर सर्व महत्त्वाची खाती तुमच्याकडे होती. तुमची सर्व बदनामी पक्षाला हानीकारक होती, तरी ती शरद पवार यांनी पोटात घातली, ती शरद पवारांची चूक होती," असेही ते म्हणाले.
"अजित पवार हे प्रचंड जातीयवादी"
ओबीसी, एसटी यांचा निधी थांबवण्याचे काम कायम अजित पवारांनी केले. जातीयवाद पाळणारा कोणता मंत्री असेल तर ते अजित पवार आहेत, अशी टीका आव्हाड यांनी केली. "मला तुमच्याकडून आणि शरद पवार यांच्याकडूनही काही नको, माझे स्वत:च्या बापापेक्षा शरद पवारांवर अधिक प्रेम आहे. शरद पवार समर्थकांना कायम अजित पवारांनी अपमानित केले आहे, हे आम्हाला माहीत आहे, पण आम्ही कधी बोललो नाही. मला शरद पवारांनी पक्षात ठेवले, तुमच्यामुळे पक्षात आलो नाही," असेही ते म्हणाले.