अजित पवार म्हणाले सुत्रधार कोण? घटनेनंतर मुख्यमंत्री संबंधित महिलेसोबत फोटोत दिसतात
By अजित मांडके | Published: November 14, 2022 08:38 PM2022-11-14T20:38:42+5:302022-11-14T20:39:10+5:30
मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे
ठाणे : कायदे कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून तयार केलेले आहेत. मात्र त्याच कायद्यांचा अशा चुकीच्या पध्दतीने वापर होत असेल तर ते नक्कीच चुकीचं आहे. त्यातही न केलेल्या गुन्ह्यात अडकवले जात असेल तर तो माणूस खचणारच. त्यामुळेच व्यतीथ होऊन आव्हाड यांनी राजीनामा दिलेला आहे. मात्र, आव्हाड हे शरद पवार यांना दैवत मानतात. त्यांचा शब्द ते महत्वपूर्ण मानतात. त्यामुळे त्यांचा जो निर्णय असेल तो आव्हाड यांना पाळावाच लागेल असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठाण्यात केले. तसेच, यामागे निश्चितच एक षडयंत्र असून त्यात गोवण्याचा प्रकार होत असून यामागे नेमके कोण आहे, ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री त्या महिलेसोबत दिसत असल्याचे फोटो दिसत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारची योग्य चौकशी करुन जे जे या प्रकरणात दोषी असतील व त्याचा मुख्य सुत्रधार कोण याचा शोध घेऊन त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.
मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांना समजविण्यासाठी पवार हे ठाण्यात आले होते. ७२ तासात राज्याच्या माजी कॅबीनेट मंत्र्यांवर दोन दोन गुन्हे दाखल होतात, हे घाणरडे राजकारण सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. आज सरकार बदलेले आहे, म्हणून विरोधकांचा आवाज अशा पध्दतीने दाबण्याचा प्रयत्न जर सरकार करीत असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे. सरकार येत असते, जात असते, कोणी कायम तेथे बसायला आलेला नसतो. जोर्पयत 145 आमदारांचा पाठींबा असतो, तो र्पयत ती व्यक्ती त्या ठिकाणी बसू शकते, हे अनेक वेळा सिध्द झालेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवे होते, किंबहुना पोलिसांनी हे सांगणो अपेक्षित होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. परंतु अशा पध्दतीने राजकारण होणार असेल तर लोकशाही, संविधान, कायदा, नियम, घटना या सगळयांनाच तिलांजली देण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष घातले पाहिजे. परंतु कायदयाचा आधार घेऊन निष्पाप व्यक्तीवर अन्याय होत असेल तर ते योग्य नाही. पोलीस दबावाखाली वागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आमच्याकडेही साडेसतरा वर्षे गृहखाते होते, मात्र आम्ही अशा पध्दतीने कायद्यांची पायमल्ली केली गेली नाही. त्यामुळे राजीनामा देता आव्हाड यांनी एकजूटपणो या विरोधात लढा देऊ असेही त्यांनी सांगितले. अधिवेषणात याविरोधात आवाज उचलला जाईल आणि जाब विचारला जाईल असेही त्यांनी सांगितले.
मध्यावती निवडणुकांची शक्यता नाही - पवार
सध्यातरी कुठेही मध्यवती निवडणुका लागणार नाहीत. असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. सध्याच्या सरकारकडे १४५ आमदारांचा पाठींबा आहे, आणि तो कुठे कमी होईल असे चित्र दिसत नाही. महाविकास आघाडीचे सरकार असतांनाही त्यांच्याकडेही १४५ आमदारांचे संख्याबळ होते. मात्र, एक गट बाहेर पडल्याने सरकार कोसळले. परंतु संजय राऊत यांनी हे विधान कसे केले, याची माहिती मी त्यांच्याशी चर्चा करुनच देईन. मात्र, तुर्तास मध्यावती निवडणुका लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.