अजित पवारांनी स्वतःचा पक्ष काढून ताकद दाखवायला हवी होती-महेश तपासे
By नितीन पंडित | Published: October 6, 2023 07:31 PM2023-10-06T19:31:12+5:302023-10-06T19:31:24+5:30
शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा विश्वासघात अजित पवार यांनी केला आहे.
भिवंडी: शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा विश्वासघात अजित पवार यांनी केला आहे.अजित पवारांना पक्ष सोडायचा होता तर त्यांनी स्वतःचा नवा पक्ष उभा करून वेगळी चूल मांडायची होती.परंतु सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी पक्ष फुटीची घोषणा केली आणि यामुळे संपूर्ण राज्यातील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते नाराज आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.
शुक्रवारी ते भिवंडी तालुक्यात शरद संपर्क अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले असता बोलत होते.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर ,तालुकाध्यक्ष गणेश गुळवी,ओबीसी जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील, रमाकांत म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पवार साहेबांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.हा पक्ष व चिन्ह यावर त्यांचाच अधिकार असून दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगा समोर ते स्वतः उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती देत बंडखोरी करणाऱ्या सर्वच आमदारांना त्यांच्या मतदारसंघात सुद्धा निवडून येण्यासाठी अशक्य होणार आहे असा विश्वास या संपर्क अभियान कार्यक्रमात दिसून येत असल्याचे महेश तपासे यांनी स्पष्ट केले आहे .
मुख्यमंत्री व केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या जिल्ह्यातील भिवंडी हे शहर वाहतूक कोंडी मुळे सर्वात संथ असल्याचे जाहीर झाले ही या राज्यकर्त्यांसाठी शरमेची बाब आहे.केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या घरा समोर तीन तीन तास नागरीक वाहतूक कोंडीत अडकून पडतात.यावर कोणीही बोलत नाही या बद्दल तपासे यांनी चिंता व्यक्त केली.