अजित पवार यांनी पक्ष काढून निवडणूक लढवावी; जितेंद्र आव्हाड यांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 11:49 AM2024-02-06T11:49:41+5:302024-02-06T11:50:01+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अजित पवार यांनी बारामतीमध्ये भाषण करताना आपणच निवडणुकीत उभे आहोत, असे समजून मतदान करा, असे आवाहन केले आहे. शिवाय, निवडणूक आयोगात सादर केलेल्या प्रमाणपत्रात शरद पवार यांना हुकूमशहा म्हटले आहे. जर, शरद पवार हे हुकूमशहा आहेत तर त्यांनी स्थापन केलेला पक्ष आणि त्यांनी देशभर पोहोचविलेले निवडणूक चिन्ह वापरून निवडणुका लढविण्याची भाषा का करता? हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतंत्र निवडणूक चिन्हावर लढून दाखवा. मग, महाराष्ट्रातील जनता तुम्हाला काय दाखवायचे ते दाखवेल, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना दिले.
आव्हाड म्हणाले की, निवडणूक आयोगात पात्र - अपात्रतेसंदर्भात लढाई सुरू आहे. त्यानुषंगानेच त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, शरद पवार यांच्यावर हुकूमशहा असल्याचे आरोप केले. शरद पवार हे कुणाचे ऐकत नाहीत. ते सर्व निर्णय एकट्यानेच घेतात, असे आरोप केले आहेत.
बापासाठी मरण आले तरी बेहत्तर
अपात्रतेबाबत पत्रकारांनी विचारले असता, निर्णय काय येणार आहे, हे आम्हास माहीत आहे.
पण, आम्हाला त्याची भीती नाही. ज्या बापाने आम्हाला घडविले. त्या बापापुढे आमदारकी काय महत्त्वाची? त्या बापासाठी मरण आले तरी बेहत्तर, असा निर्धारही आव्हाड यांनी व्यक्त केला.
आव्हाड म्हणाले, प्रतिज्ञापत्रावर पहिली सही सुनील तटकरे यांनी केली आहे. त्यांनाच शरद पवार यांनी दोन वेळा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले होते, मंत्रिपदही दिले होते.
त्यांच्या मुलीला आमदारकी आणि मंत्रिमंडळात मानाचे स्थान दिले होते. एवढं सगळं घेऊनही तटकरे हे शरद पवार यांना हुकूमशहा कसे काय म्हणू शकतात? राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे जन्मदाते शरद पवार हेच आहेत.
त्यांनीच पक्षाला निवडणूक चिन्ह मिळवून दिले आहे. आता हाच पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.